अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 14 मार्च 2022, सकाळी 11.00
● तब्बल दोन वर्षानंतर मूळ परिस्थिती
● 369 जणांचे स्वॅब तपासणी
● बाधित निरंक, पॉझिटिव्हीटी निरंक
सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्हा तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना मुक्त झालेला आहे. कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने घेतलेली मेहनत नक्कीच यशस्वी ठरली असून, अखेर जिल्ह्यातील सर्व तालुके निरंक आले. सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात जिल्हा कोरोनामुक्तीत यश आले आहे.
इतिहासात नोंद होणार
जगावर दोन वर्षांपूर्वी कोरोनाचे संकट आले होते. यामध्ये सातारा जिल्हा चांगलाच होरपळून निघाला. कोरोना रुपी संकटापासून बचाव होण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडॉनमध्ये सातारकरांनी मोठे हाल सोसले. जेव्हा पहिला रुग्ण आढळून आला होता तेव्हा आरोग्य यंत्रणेसह प्रशासनापुढे पेच झाला होता. कोरोनामुळे आलेला जिल्ह्यातील पहिला मृत्यू भयानक मानला गेला. बाधित आढळून आलेल्याना उपचार करण्यासाठी कोरोना केअर सेंटर, जंबो कोव्हिड सेंटर उभी राहिली होती. बाहेर फिरणाऱ्यांनी पोलिसांच्या काठ्या खाल्या होत्या. काहीच्यावर गुन्हे दाखल झाले. काहीजण उपाशी पोटी बेहाल झाले. काहीजणाना चुकीच्या उपचारामुळे जगाचा निरोप घ्यावा लागला. जे न ऐकलेले सॅनिटायजर, ऑक्सिजन, रेमडीसिव्हर हे शब्द ऐकायला मिळाले. त्या काळी पहिला कोरोना मुक्त झालेल्या बधितांचे फुल देऊन स्वागत केले होते. अनेकांनी समाजासाठी काम केले. आरोग्य यंत्रणेने चांगले काम केले. तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण, विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार, जिल्हा लसीकरण मोहीम अधिकारी डॉ.प्रमोद शिर्के यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. जानेवारी महिन्यात बाधित वाढ झाली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात ही वाढ घटू लागली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल होऊ लागली होती.14 मार्च ला जिल्हा कोरोना मुक्त झालेला आहे.
साताऱ्यातली सवयभान चळवळ
कोरोनाचे भूत जेव्हा साताऱ्यात पोहचले तेव्हा त्यापासून प्रत्येक नागरिक यातून सुखरूप असावा यासाठी सातारा शहरात सवयभान चळवळ राबवली गेली. त्या चळवळीत समाजासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते स्वतःला झोकून देऊन काम करत होते.
कोव्हिड डिफेंडर ग्रुपचे काम
कोरोना बाधित आढळून आला रुग्ण तर त्या रुग्णाला योग्य उपचार मिळावेत, बेड मिळावा, ऑक्सिजन मिळावा, खाजगी हॉस्पिटलमध्ये होत असलेली लूट थांबावी यासाठी सातारा शहरात कोव्हिड डिफेंडर ग्रुप मोलाचे कार्य करत होता.
लसीकरणाची मोहिम यशस्वी
कोरोनाला पासून बचाव करण्यासाठी लसीकरण सुरू झाले. जिल्ह्यात ही मोहीम प्रशासनाने शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राबविण्यात आली. जिल्ह्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने कोणी मोफत तर कोणी विकत घेऊन कोणी रात्र जागून कोणी वशिला लावून घेतली. प्रशासनाने मात्र ही मोहिम यशस्वी केली.
“तरुण भारत”ची अचूक बातमी
तरुण भारतने कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून तंतोतंत माहिती देण्याचे काम अचूक बातमीच्या माध्यमातून केले. मग कडक लॉकडाऊन, पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट यामध्ये अचूक बातमी घराघरात पोहचली. जिल्ह्यातील वाचकांना अचूकने अचूक माहिती देऊन कोरोना भीती दूर केली.
सोमवारी
नमुने-369
बाधित-00
सोमवारपर्यंत
नमुने-25,63,182
बाधित-2,79,149
मृत्यू-6,681
मुक्त-2,77,110