प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिकेचे करनिर्धारक व संग्राहक असताना संजय भोसले यांनी 2011 व 2012, 2013 पासूनच्या काळात शहरातील दहा ते बारा हजार मिळकतींना त्यांच्या असेसमेंट फॉर्मवर शून्य घरफाळा आकारणी करून महापालिकेचे कोटÎवधी रूपयांचे नुकसान केले आहे. त्यांच्यावर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी त्वरीत फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांना निलंबित करावी, अशी मागणी माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी एका पत्रकाव्दारे केली आहे.
शेटे यांनी पत्रकात म्हटलेआहे. भोसले यांनी मिळकतींच्या मोठ मोठÎा क्षेत्रांची नोंद न करता आर्थिक भ्रष्टाचार करून दहा ते बाराहजार मिळकतीत शून्य क्षेत्राची आकारणी करून असेसमेंट केले आहे. यासाठी त्यांनी पीटी युजर आयडी आणि एडीट प्रणालीचा वापर केला आहे. याबाबतचे पुरावे मी तत्कालिन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना तसेच त्यांनी नेमलेल्या घरफाळा चौकशी समितीच्या प्रमुखांसह मुख्य लेखापाल, मुख्य लेखापरीक्षक यांच्याकडे दिले आहे. पण भोसले व त्यांच्या बगलबच्च्यांना वाचविण्यासाठी या भ्रष्टाचारकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यापुढे तरी भोसले यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे शेटे यांनी पत्रकात म्हटले आहे.
युजर आयडी, पासवर्डची माहिती शेटे यांनी प्रशासकांना द्यावी ः संजय भोसले
भूपाल शेटे हे वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यांना घरफाळा विभागातील प्रत्येक बाबीकडे घोटाळा म्हणून पाहण्याची त्यांची दृष्टी झाली आहे. इन्व्हॅलिड प्रॉपटीचा डाटा सिस्टिम मॅनेजरकडे आहे. तो कोणत्या युजर आयडी, कोणत्या पासवर्डवरून मधून केला आहे, याची माहिती शेटे यांनी घ्यावी. आणि ती प्रशासक डॉ. बलकवडे यांच्याकडे द्यावी, असे आव्हान संजय भोसले यांनी भूपाल शेटे यांना दिले आहे.