मुंब्रा येथून आलेल्या बालकासह चौघांना लागण
प्रतिनिधी/ गुहागर
जिल्हय़ात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडलेला व उपचारानंतर बराही झालेल्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे बरोबर दोन महिन्यांनी कोरोनाने पुन्हा एन्ट्री केली आहे. मुंब्रा येथून आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये तीन वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. हे कुटुंब होम क्वारंटाईन असल्याने केवळ रोशन मोहल्ला आयसोलेट करण्यात आले आहे.
नव्याने 4 रूग्ण सापडल्याची बातमी कळताच शृंगारतळी पुन्हा हादरली आहे. सुरूवातीला मुंबई-पुण्यातून येणाऱया सर्वांचेच स्वॅब घेतले जात होते. परंतु 13 मे पासून एकाचाही स्वॅब घेतला गेला नसल्याने कन्टेंट झोनमधून आलेले किती बाधित आहे याचा धसका सध्या गुहागर तालुक्याने घेतला आहे. 12 मे रोजी मुंब्रा येथून एकाच कुटुंबातील पाचजण शृंगारतळीतील रोशन मोहल्ला येथे आले होते. या पाचजणांमध्ये दोन भाऊ, 3 वर्षाचा मुलगा, मुलाची आजी असे चारजण पॉझिटीव्ह निघाले आहेत. बालकाच्या आईचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला आहे. मुंब्रा येथून चिपळूणपर्यंत खासगी वाहनाने हे पाचजण आले होते. चिपळुण तालुक्यातील वाघिवरे येथील आणखी चौघेजण या वाहनामध्ये होते. यामुळे वाहनचालक त्या चौघांना घेऊन वाघिवरे येथे गेला. यानंतर या पाचजणांना घेऊन मुलाचा काका शृंगारतळीतून आपले वाहन घेऊन गुहागरात आला होता.
गुहागरमध्ये येताच या पाचजणांचे ग्रामीण रूग्णालयामध्ये स्वॅब घेण्यात आले होते. 3 वर्षांचा मुलगा व त्याची वयोवृद्ध आजी बरोबर असल्याने कुटुंबांने होम क्वारंटाईनची परवानगी मिळवली होती. त्यानुसार कुटुंबातील 8 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले.
या कुटुंबाला चिपळुणमधून घेऊन येणारा मुलाचा काका हा रत्नागिरी येथे शासकीय नोकरीत आहे. 18 मे रोजी तो रत्नागिरी येथे कामावर हजर झाला आहे. कुटुंबीयांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने त्यानेही बुधवारी स्वॅब तपासणीसाठी दिला आहे. तसेच वाघिवरे येथील खाजगी वाहनचालक व त्याच्याबरोबर आलेले चौघाजणांची माहीती चिपळूण प्रशासनाला देण्यात आली आहे.
खासगी डॉक्टरसह पाचजणांचे घेतले स्वॅब
कारोना पॉझिटीव्ह आलेले पाचजणांचे कुटुंब आल्यापासून घरातच आहे. केवळ त्या मुलाची गर्भवती काकी व काका हे शृंगारतळीतील एका खासगी दवाखान्यामध्ये तपासणीसाठी गेले होते. यामुळे डॉक्टरसह स्टाफमधील दोघांचे नमुने घेण्यात आले आहे. मुलाचे आजोबा व काकी यांचेही स्वॅब घेऊन त्यांना घरामध्येच क्वारंटाईन करण्यात आले आहे.
आईही गेली कोविड केअर सेंटरमध्ये
पॉझिटीव्ह आलेल्या चार जणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत. त्यांना वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात कोवीड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले. 3 वर्षाचा मुलगा ााईशिवाय रहात नसल्याने निगेटीव्ह असूनही आईसुद्धा कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरणामध्ये दाखल झाली आहे.
140 घरांतील 527 लोकांची होणार आरोग्य तपासणी
कोराना पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांना पाटपन्हाळे ग्रामकृती दलाचे अध्यक्ष सरपंच संजय पवार यांनी, त्यांच्या रोशन मोहल्ला येथील स्वतःच्या घरामध्ये क्वारंटाईन केले होते. यामुळे संपूर्ण शृंगारतळी आयसोलेट न करता केवळ रोशन मोहल्लाच आयसोलेट करण्यात आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डी. एल. चकरे, डॉ. पंकज देशमुख आरोग्य विभागाचे पथक घेऊन याठिकाणी दाखल झाले आहे. रोशन मोहल्ल्यात एकूण 140 घरे असून 527 लोकसंख्या आहे. यामुळे पुढील 14 दिवस येथील लोकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.