प्रतिनिधी / मडगाव
सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी शॅडो कौन्सिल फॉर मडगावने आगामी पालिका निवडणुकीत संपर्कविरहीत प्रचार मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कोविडच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आहे, असे शॅडो कौन्सिलचे निमंत्रक व माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
प्रभाग 20 मधील निवडणूक कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कुतिन्हो यांनी सांगितले की, शॅडो कौन्सिलच्या सहा उमेदवारांनी स्वतःहून सर्व आवश्यक दक्षता घेण्याचे व मतदारांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे ठरविले आहे. आमची नैतिक जबाबदारी लक्षात घेता शॅडो कौन्सिल पुरस्कृत कोणत्याही उमेदवाराने पाचहून अधिक जणांसह निवडणूक प्रचार करू नये, असे त्यांनी सांगितले.
कित्येक राजकीय पक्षांचे नेते, उमेदवार हे 30 ते 40 व्यक्तींसह घरोघरी फिरताना दिसतात. हे जोखमीमध्ये भर घालत आहे, असे कुतिन्हो यांनी नजरेस आणून दिले. प्रभाग 3 मधील शॅडो कौन्सिलच्या उमेदवार ऍड. सियोल वाझ यांनी निवडणूक प्रक्रियेची तुलना ‘लोकशाही उत्सवा’शी केली आणि त्या म्हणाल्या की, जशी इतर सणांच्या वेळी काळजी घेण्याची सूचना केली जाते तशीच प्रत्येक उमेदवार आणि राजकीय पक्षाने आरोग्याचे रक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. यावेळी मानुएल ओलिव्हेरा, व्हेहम फर्नांडिस, स्नेहल वंसकर, व्हेरेन डिसिल्वा, पोमा केरकर असे सर्व सहा उमेदवार उपस्थित होते.