सेन्सेक्समध्ये 395 अंकांची तेजी -रियल्टी, बँकिंग समभागांचा आधार
वृत्तसंस्था/ मुंबई
मागच्या आठवडय़ात काहीशा कमकुवत कामगिरीचा अनुभव घेतलेल्या भारतीय शेअर बाजाराने सोमवारी मात्र पहिल्या दिवशी तेजीचा सूर धरल्याचे दिसून आले. सेन्सेक्स निर्देशांक 395 अंकांच्या आणि निफ्टी निर्देशांक 112 अंकांच्या वाढीसह बंद होण्यात यशस्वी झाला आहे. रियल्टी व बँकिंग समभागांच्या खरेदीचा लाभ उठवत भारतीय शेअरबाजाराने जोमाने वाटचाल चालू ठेवली होती.
भारतीय शेअर बाजारात सोमवारी सरतेशेवटी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 395 अंकांच्या तेजीसह 52,880 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 112 अंकांच्या वाढीसह 15,834.35 अंकांवर बंद झाला. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स 360 अंकांची तेजी सांभाळून होता तर निफ्टी निर्देशांकाने 15,806 अंकांवर मजल मारली होती. बाजारात चौफेर खरेदी होत असून दोन्ही निर्देशांकांनी तेजीचा रस्ता धरला होता. सेन्सेक्स दुपारी 52,850 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टीतील मिडकॅप निर्देशांक अर्धा टक्का तर स्मॉलकॅप निर्देशांक 2 टक्के तेजीत होता. निफ्टीतील अधिकतर क्षेत्रे नफ्यात होती. आयशर मोटर्स, बजाज ऑटो, हिंडाल्को, अल्ट्राटेक सिमेंट, ऍक्सिस बँक, पॉवरग्रिड कॉर्प व टीसीएसमधील खरेदीचा लाभ शेअरबाजाराला उठवता आला. जागतिक बाजारातील मिश्र वातावरणामुळे भारतीय शेअरबाजाराने सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी तेजीसह सुरुवात केली.
टीसीएस व इन्फोसिसचे समभाग तोटय़ात होते. सेन्सेक्समध्ये लार्सन ऍण्ड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह व बजाज फायनान्सचे समभाग तेजीत होते. हिंडाल्कोचे समभाग 3.5 टक्के तर टाटा स्टीलचे समभाग 2 टक्के तेजीत होते. दुसरीकडे एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, टेक महिंद्रा, बीपीसीएल, टायटन कंपनी, सिप्ला यांचे समभाग नुकसानीत होते. शुक्रवारी शेवटच्या तासात खरेदीमुळे सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाले होते. सेन्सेक्स 166 अंकांच्या तेजीसह 52484 वर तर निफ्टी निर्देशांक 42 अंकांच्या वाढीसह 15722 वर बंद झाला होता.
आशियाई बाजारात मिळताजुळता कल दिसला. चीनचा शांघाई मजबूत होता. जपानचा निक्केई व हाँगकाँगच्या हँगसेंगचा निर्देशांक कमकुवत होता. कोरियाचा कोस्पी मात्र 0.35 टक्के मजबूत होता. शुक्रवारी अमेरिकी बाजार तेजीसह बंद झाले होते. डाओ जोन्स 0.44 टक्के व नॅसडॅक 0.81 टक्के तेजीत होता.