सेन्सेक्समध्ये 508 अंकांची वाढ – बँकिंग, वित्त कंपन्यांचा आधार
वृत्तसंस्था/ मुंबई
सकारात्मक जागतिक संकेताच्या जोरावर भारतीय शेअर बाजार सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला आहे. कोरोनाच्या भयावह स्थितीत चौफेर खरेदीमुळे बाजाराला मजबुती प्राप्त झाली. दिवसअखेर सेन्सेक्स निर्देशांक 508 अंकांच्या वाढीसह तर निफ्टी 143 अंकांच्या वाढीसह बंद झाला. धातू, वित्त आणि बँकिंग क्षेत्रातल्या समभागांनी बाजाराला आधार दिला.
मजबुत जागतिक संकेतामुळे बाजार आज बहरात होता. काही राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवता आले असल्याचे संकेत मिळाल्याने याचा परिणाम शेअर बाजारावर सकारात्मक दिसला. सोमवारी सरतेशेवटी सेन्सेक्स निर्देशांक 508 अंकांच्या वाढीसह 48,386.51 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 143 अंकांच्या वाढीसह 14,485 अंकांवर बंद झाला. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स 600 अंकांनी वरचढ झाला होता. सकाळी 318 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स निर्देशांकाने तर निफ्टी निर्देशांकाने 108 अंकांच्या वाढीसह दिवसाची सुरूवात सकारात्मक केली होती. आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज व कोटक बँक यांचे समभाग तेजीत राहिले होते. दिवसात एकावेळी सेन्सेक्स 641 अंकांच्या वाढीसह निर्देशांक 48,519.80 अंकांवर व्यवहार करत होता. तर तिकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टीही तेजीत होता. निफ्टी निर्देशांक 178.90 अंकांच्या वाढीसह 14,520.25 अंकांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय बँकेचा समभाग सर्वाधिक 5 टक्के इतकी तेजी दर्शवत होता. बँकेने आपल्या तिमाहीचे आकडे शनिवारी घोषित केले आहेत. अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, ओएनजीसी, ऍक्सिस बँक, कोटक बँक व बजाज फायनान्स यांचे समभाग तेजी दर्शवत होते.
मागच्या शुक्रवारी सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले होते. सेन्सेक्समध्ये 202 अंकांची तर निफ्टीत 64 अंकांची घसरण नोंदवली गेली होती. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 1360.76 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले आहेत. इतर बाजारांचा विचार करता शांघाई, हाँगकाँग, टोकियो व सेऊल बाजार दुपारपर्यंत तेजी दर्शवत होते. टेक व फार्मा कंपनीच्या समभागात घसरण दिसली. एचसीएल टेकचा समभाग अडीच टक्के खाली आला होता. निफ्टीतील 39 समभाग तेजीसह बंद झाले तर 11 समभाग नुकसानीसह बंद झाले. बीएसईनुसार लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 2,04,15,276 कोटी रुपये इतके होते.