सेन्सेक्स 316 तर निफ्टी 118 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था / मुंबई
देशातील भांडवली बाजारात तेजीची घोडदौड सलग आठव्या दिवशीही कायम राहिली आहे. चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी सेन्सेक्स 316.02 अंकांनी मजबूत झाला. मुख्य स्वरुपात जागतिक बाजारांचा सकारात्मक कल आणि मजबूत भांडवलातील प्रवाहामुळे बाजाराने तेजी नोंदवली असल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या जोरावर सेन्सेक्स दिवसअखेर 316.02 अंकांनी वधारुन निर्देशांक 43,593.67 वर नवा विक्रम प्राप्त करत बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 118.05 अंकांनी वधारुन 12,749.15 वर स्थिरावला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बुधवारी टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक 8 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. सोबत ऍक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, इन्फोसिस,सन फार्मा, कोटक बँक, ओएनजीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या समभागांनी समाधानकारक नफा कमाई केली आहे. दुसऱया बाजूला इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, एशियन पेन्ट्स आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
बीओएनटेक आणि फायजर यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या कोरोना विषाणूच्या लसीची चाचणी यशस्वी टप्प्यात आली आहे. तसेच सप्टेंबर तिमाहीतील सकारात्मक नफा कमाईचे आकडे सादर झाल्यामुळे या सकारात्मक घडामोडींचे लाभ भांडवली बाजाराला उठवता आले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह कायम राहिला असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
प्रमुख क्षेत्रांची कामगिरी
आठव्या सत्रात भांडवली बाजारात चढउताराचे वातावरण पहावयास मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने औषध, धातू, आयटी आणि वाहन कंपन्या आदी क्षेत्रातील निर्देशांक मजबूत राहिले होते. देशातील बिहार विधानसभा निवडणूक निकालाच्या प्रभावाने देशातील बाजाराला लाभ झाला आहे. शांघाय आणि हाँगकाँगचे बाजार नुकसानीत राहिले आहेत.