सेन्सेक्स आणि निफ्टीत झाला समाधानकारक वधार
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय शेअरबाजारांमध्ये नव्या सप्ताहाच्या प्रारंभीच्या दिवशी सकारात्मक वातावरण दिसून आले आहे. सोमवारच्या व्यवहारात मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 125.13 अंकांनी वधारुन 54,402.85 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 20.05 अंकांनी वधारुन 16,258.25 अंकांवर दिवसअखेर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निदेशांकांमध्येही वाढ झाली.
सोमवारच्या व्यवहारांमध्ये वित्त कंपन्या आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्या प्रामुख्याने तेजीत असल्याचे पहावयास मिळाले. याउलट भांडवली वस्तू आणि ग्राहकोपयोगी वस्तूंनिर्मिती कंपन्यांच्या समभागांमध्ये काही प्रमाणात घसरण झाली. महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. त्या खालोखाल ऍक्सिस बँक, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, टिटन आणि रेड्डीज लॅब या कंपन्यांचे समभाग वधारले. भारती एअरटेल, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो, एटीपीसी आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे समभाग मंदीत होते.
गेला एक आठवडाभर तेजीत असलेल्या समभागांची विक्र ाr करुन नफा कमाई करण्याकडे काही गुंतवणूकदारांचा कल दिसला. त्यामुळे दिवसाच्या प्रारंभी शेअरबाजारांच्या निर्देशांकांमध्ये घसरण झाली होती. तथापि माहिती तंत्रज्ञान आणि वित्त कंपन्यांनी निर्देशांकांना मोठय़ा प्रमाणात हात दिल्याने घसरण रोखली गेली.
अर्थव्यवस्था सुधारण्याची चिन्हे कोरोना परिस्थिती कायम असली तरी अर्थव्यवस्था सुधारण्याचे संकेत मिळत आहेत. त्यांचे प्रत्यंतर शेअरबाजारांमध्ये उमटत आहे. कर्ज उचलीत वाढ होत आहे. त्यामुळे वित्त कंपन्यांचे समभाग तेजीत येत आहेत. कोरोनामुळे घालण्यात आलेले सर्व निर्बंध लवकरात लवकर हटतील आणि बाजार पूर्णपणे मुक्त होतील, अशी शक्यता निर्माण झाल्याने गुंतवणूकदार उत्साहित आहेत.
शांघाई आणि हाँगकाँग शेअरबाजारांमध्ये काही प्रमाणात वधार दिसून आला. मात्र सेऊल शेअरबाजार मंदीत राहिला. कच्च्या इंधन तेलाच्या दरात काही प्रमाणात घट झाली. मात्र, ती विशेष नव्हती. रुपया डॉलरच्या तुलनेत काही प्रमाणात घसरला.