कोरोना, महागाईचा बाजारावर परिणाम – सेन्सेक्स 397 अंकांनी घसरला
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी सलग दुसऱया सत्रामध्ये शेअर बाजाराने घसरण नोंदवली आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरण व विक्रीत आलेल्या जोरामुळे सेन्सेक्स निर्देशांकामध्ये 397 अंकांची आणि निफ्टी निर्देशांकात 101 अंकांची घसरण दिसून आली.
सोमवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक 50,395.08 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 14,929.50 वर बंद झाला. औद्योगिक उत्पादनात झालेली घट व महागाईत झालेली वाढ त्याचप्रमाणे कोरोना रुग्णसंख्येत झालेली वाढ या तिहेरी घटनांचा परिणाम शेअर बाजारावर सोमवारी दिसून आला. आज सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा तो घसरणीच्या मुडमध्येच होता. काही राज्यांमध्ये लॉकडाऊन पुन्हा सुरु केल्याने कोरोनाची भिती पुन्हा देशवासियांना जाणवू लागली आहे. याचा परिणाम व्यावसायिकांवरही होताना दिसला.
सोमवारी शेअरबाजारात घसरणीचा माहोल दिसून आला. बीएसई सेन्सेक्स दुपारपर्यंतच्या सत्रात 787 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 50,004.68 अंकांवर होता. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सचा निर्देशांक 49,899.03 अंकांपर्यंत खाली घसरला होता. याआधी 2 मार्च रोजी सेन्सेक्सने 49807.12 चा स्तर गाठला होता. ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स व बजाज फिनसर्व्हचे समभाग 3-3 टक्के घसरण नोंदवत होते. तर दुसरीकडे पॉवरग्रिडचे समभाग मात्र 2 टक्के वाढ नोंदवत होते. निफ्टी निर्देशांक 221 अंकांच्या घसरणीसह 14,809.30 अंकांवर होता. देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याच्या कारणास्तव शेअरबाजारावर दबाव दिसला. चीन व कोरियातील शेअरबाजारात घसरण होती तर जपान, हाँगकाँग व ऑस्ट्रेलियातील बाजारही घसरणीसह व्यवहार करत होते. एकंदर काय तर जागतिक बाजारातही सोमवारी नकारात्मक वातावरण दिसून आले.
बँकिंग समभागांची विक्री
बाजारात चौफेर विक्री दिसून आली. यात बँकिंग क्षेत्रातील समभागांची मोठय़ा प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून आले. निफ्टी बँकेचा निर्देशांक दुपारी 952 अंकांखाली आला होता. धातू व ऑटो निर्देशांक 1 टक्के इतका घसरलेला दिसला.
बीएसईत 3044 समभागांपैकी 960 तेजीसह तर 1908 समभाग घसरण नोंदवत होते. लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल घटून 205.50 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. 12 मार्चला ते 207.89 लाख कोटी रुपये झाले होते.