सेन्सेक्स, निफ्टी किंचित वधारले, रिऍल्टी समभाग जोमात
वृत्तसंस्था/ मुंबई
शेअर बाजाराची आठवडय़ाची पहिल्या दिवशीची वाटचालही नेहमीप्रमाणे तेजीतच राहिली आहे. अर्थात काहीशी तेजी प्राप्त करत सेन्सेक्स आणि निफ्टी बंद झाले आहेत. सोमवारी ऑटो आणि रिऍल्टी क्षेत्रातील समभागांनी बाजाराला आधार दिला असल्याचे दिसून आले आहे.
सोमवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर 29 अंकांच्या वधारासह बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 60,077.88 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक मात्र 1 अंकांच्या अल्पशा वाढीसह 17,855,10 अंकांवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्सने 60,421 अंकांपर्यंत मजल मारली तर 59,887 अंकांपर्यंतही निर्देशांक खालीही आला. याचप्रमाणे निफ्टीचीही दिवसातली वाटचाल राहिली. निफ्टी 17932 वर खुला होत निफ्टीने 17943 पर्यंत धाव घेतली. यातही ऑटो निर्देशांक 3.22 टक्के इतका तेजीसह बंद झाला. मारुती, महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा मोटर्स तसेच निफ्टी ऑटोतील 12 समभाग तेजीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 13 तेजीसह बंद झाले. मारुतीचे समभाग 6.53 टक्के, महिंद्रा आणि महिंद्रा 4.14 टक्के व बजाज ऑटोचे 2.77 तेजी दाखवत होते. याव्यतिरीक्त बँका, वित्तसंस्था सेवा, माध्यम, धातू, सार्वजनिक बँका, खासगी बँकांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले. रिऍल्टी निर्देशांक 2.99 टक्के इतका वाढल्याचा दिसला.
सकाळी सेन्सेक्स निर्देशांक 255 अंकांच्या तेजीसह 60,303 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 17,932 अंकांवर खुला झाला होता. सुरूवातीच्या सत्रात निफ्टीने 63 अंकांची वाढ दर्शवली होती. ओएनजीसी 2.76 टक्के वाढीसह आघाडीवर राहिली. टाटा मोटर्स, आयशर मोटर्स आणि कोल इंडिया यांचे समभागही तेजी दाखवत बंद झाले. एचसीएल टेकचे समभाग 4.58 टक्के आणि टेक महिंद्राचे समभाग 3.30 टक्के घसरणीसह बंद झाले. विप्रो, डिव्हिस लॅब्स, टाटा कन्झुमर यांचा तेजी गमावण्यात समावेश होता. जागतिक बाजारात अमेरिकेतील बाजारात मिळताजुळता कल होता.