सेन्सेक्स 144 तर निफ्टी 50 अंकांच्या घसरणीसह बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारासह जगभरातील शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून तेजीचा माहोल राहिला होता. यामध्ये कोरोना लसीसंदर्भात मिळणाऱया सकारात्मक बातम्यांसह आंतरराष्ट्रीय व्यापारासह राजकारणातील बदलता कल यामुळे शेअर बाजार मजबूत स्थिती प्राप्त करत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. चालू आठवडय़ातील चौथ्या दिवशी गुरुवारी एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंडसइंड बँक यांच्या समभागातील नफा कमाईमुळे सेन्सेक्स घसरणीसह बंद झाला आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 143.62 अंकांनी घसरुन निर्देशांक 45,959.88 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 50.80 अंकांनी घसरुन निर्देशांक 13,478.30 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये गुरुवारी अल्ट्राटेक सिमेंट सर्वाधिक नुकसानीत राहिले असून यांचे समभाग 3 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. याच्याविरुद्ध बाजूला मात्र नेस्ले इंडिया, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि कोटक बँक यांचे समभाग वधारले आहेत.
भांडवली बाजारामध्ये उच्च स्तरावर झालेल्या नफाकमाईच्या प्रभावामुळे बाजार घसरणीत राहिला आहे. यामध्ये दुपारपर्यंतच्या सत्रात बाजार नीच्चांकी पातळीवरुन काही प्रमाणात सावरत गेल्याचेही वातावरण निर्माण झाले होते असे अभ्यासकांनी म्हटले आहे.
एडीबी अहवालाचा प्रभाव
आशियाई विकास बँक (एडीबी) यांच्याकडून भारतासह आशिया-प्रशांत विभागातील देशांच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक सुधारणा होणार असल्याचा अंदाज आपल्या आउटलूक या अहवालात नुकताच मांडला आहे. अगोदर निश्चित केलेल्या जीडीपी घसरणीच्या अंदाजात बदल करुन काहीसा हा दर सावरण्याचे संकेत व्यक्त केले आहेत.