सेन्सेक्स 354 अंकांनी मजबूत : बँकांचे समभाग वधारले
वृत्तसंस्था/ मुंबई
शेअर बाजारातील तेजीची घोडदौड सप्ताहाच्या अंतिम दिवशी शुक्रवारीही कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. सेन्सेक्स तब्बल 354 अंकांची तेजी नोंदवत बंद झाला आहे. तेजी नोंदवण्यास प्रामुख्याने बँकांच्या समभागातील तेजी आणि विदेशी निधीच्या प्रवाहाच्या बळावर ही मजबूत स्थिती प्राप्त करण्यात बाजाराला यश मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या बळावर सेन्सेक्सने दिवसभरात 353.84 अंकांची तेजी नोंदवत 39,467.31 वर झेप घेतली आहे. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 88.35 अंकांनी वधारुन निर्देशांक 11,647.60 वर स्थिरावला आहे. दिवसभरातील व्यवहाराच्या दरम्यान सेन्सेक्सने जवळपास 39,579.58 चा उच्चांक गाठल्याची नोंद करण्यात आली आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक आठ टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. सोबत ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, स्टेट बँक आणि कोटक महिंद्राचे समभागही लाभात राहिले आहेत. मात्र अन्य कंपन्यांपैकी पॉवरग्रिड कॉर्प, इन्फोसिस, मारुती सुझुकी, एनटीपीसी, एशियन पेन्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि टाटा स्टील यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
आर्थिक पुनर्रचना आणि वित्तीय तसेच अन्य घटकांवर अतिरिक्त समर्थन मिळण्याच्या अपेक्षेमुळे बाजारातील तेजी कायम राहिली आहे. तसेच विदेशी निधीचा प्रवाह कायम असून अमेरिकी डॉलरमध्ये घसरण राहिल्याने देशातील बाजाराला आपली घोडदौड कायम राखण्यास मदत मिळाल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलियोमधील गुंतवणूक रुपाने निव्वळ 1,164.32 कोटी रुपयांचा लिलाव झाल्याचे पहावयास मिळाले आहे. तसेच रुपयाही जोरदार तेजी नोंदवत आहे. रुपया 43 पैशांनी मजबूत होत वधारुन 73.39 प्रति डॉलरवर बंद झाला आहे. अन्य बाजारात आशियाई बाजारातील चीनचा शांघाय कम्पोझिट, हाँगकाँगचा हँगसेंग व दक्षिण कोरियाचा कोस्पी हे लाभात राहिले आहेत.