सेन्सेक्स1335 अंकांनी वधारला, एचडीएफसी बँक सर्वाधिक नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने तब्बल 1335 अंकांची मोठी उसळी घेतल्याचे पहायला मिळाले. एचडीएफसी बँक- ाखएचडीएफसी लिमिटेड यांच्या विलीनीकरण बातमीने शेअर बाजार तेजीसह बंद झाला. एचडीएफसी बँकेचे समभाग सर्वाधिक नफ्यात राहिले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1335 अंकांच्या वाढीसह 60,611.74 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशाक 382 अंकांच्या वाढीसह 18,053.40 अंकांवर बंद झाल्याचे दिसून आले. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड यांच्या विलीनीकरणाच्या बातमीनंतर बाजाराने तेजीची घोडदौड कायम ठेवली. तर दुसरीकडे निफ्टी बँकेचा निर्देशांकही 1480 अंकांच्या वधारासह 38,635.20 अंकांवर बंद झाल्याचे पहायला मिळाले. सेन्सेक्समध्ये एचडीएफसी बँकेचे समभाग 9.81 टक्के आणि एचडीएफसी लिमिटेडचे समभाग 9.15 टक्के इतके वाढले होते. सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ टायटन आणि इन्फोसिसचे समभाग घसरणीसोबत बंद झाले होते. सोमवारी सकाळी सेन्सेक्स तेजीसह 59,764 अंकांवर खुला झाला होता. निफ्टीत एचडीएफसी बँक, एचडीएफसी लिमिटेड, अदानी पोर्टस्, एचडीएफसी लाइफ तसेच कोटक बँक यांचे समभाग सर्वाधिक वाढलेले दिसले. जेएसडब्ल्यूचा समभाग सर्वाधिक घसरलेला दिसला. निफ्टीतील सर्व क्षेत्रांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले होते. निफ्टीत निफ्टी बँकेचा निर्देशांक 4 टक्के, वित्त सेवा निर्देशांक 4.64 टक्के इतका सर्वाधिक तेजीत राहिला. ऑटो क्षेत्राचा निर्देशांक 1.19 टक्के व आयटी निर्देशांक 0.27 टक्के तेजीसोबत बंद झाला तर खासगी बँकांचा निर्देशांक 3.94 टक्के इतका तेजीत होता.
विदेशातील बाजारांचा विचार केल्यास अमेरिकेचे व युरोपियन बाजारही तेजीत होते. आशियाई बाजारात निक्केई 70 अंकांनी, हँगसेंग 462 अंकांच्या वाढीसह कार्यरत होते.