सेन्सेक्समध्ये 929 अंकांची वाढ, कोल इंडिया सर्वाधिक नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
नव्या वर्षाची शेअर बाजाराची पहिल्या दिवशीची सुरूवात ही धडाकेबाज फलंदाजीने झाली. सेन्सेक्स निर्देशांकाने 900 अंकांची उसळी घेण्यासोबत निफ्टीही तेजी राखून होता. कोल इंडियाचे समभाग सर्वाधिक 6 टक्के इतके वाढलेले दिसले.
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 929 अंकांच्या दमदार वाढीसह 59,183.22 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 271 अंकांच्या वाढीसह 17,625.70 अंकांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी दीड टक्के इतकी वाढ दर्शवली. रिलायन्ससह बँकिंग, आयटी व धातू क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा कल होता, ज्याचा लाभ बाजाराला झाला. सेन्सेक्समध्ये 25 आणि निफ्टीतील 44 समभाग हे वधारत बंद झाले.
शेअर बाजारातील वर्षाच्या पहिल्या दिवशी बीएसई सेन्सेक्स चांगलीच दमदार कामगिरी करताना दिसून आला. जवळपास 1 हजार अंकांनी वाढ दर्शवत दिमाखान सेन्सेक्स 59,140 अंकांवर व्यवहार करत होता. तर दुसरीकडे एकावेळी निफ्टी निर्देशांकही 256 अंकाच्या वाढीसह 17,610 अंकांवर व्यवहार करत होता. सकाळी निफ्टी 17,387 अंकांवर खुला झाला होता.
वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सेन्सेक्स वाढीसह बंद झाला होता. लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 269.39 लाख कोटी रुपये होते. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 57 अंकांच्या वाढीसह 58,310 अंकांवर खुला झाला. बजाज फिनसर्व्ह आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग मोठय़ा प्रमाणात वाढलेले दिसले. विप्रो, लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंटस्, टेक महिंद्रा, एनटीपीसी व टीसीएस यांचे समभागही वधारलेले होते. एसबीआय, महिंद्रा आणि महिंद्रा, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डिज लॅब आणि टायटन यांचे समभाग घसरणीत होते. 504 समभागांना अप्पर सर्किट तर 76 समभागांना लोअर सर्किट लागले होते. निफ्टीत मिडकॅप, बँकिंग आणि वित्तसंबंधीत क्षेत्रासह निफ्टी नेक्स्ट 50 निर्देशांकही तेजीत होता. निफ्टी निर्देशांकातील समभागांचा विचार करता टाटा मोटर्स, कोल इंडिया, मारूती आणि आयशर यांच्या समभागात तेजी होती. सिप्ला, इंडसइंड बँक, हिंडाल्को यांचे समभाग मात्र नुकसानीत व्यवहार करत होते.