दोन्ही निर्देशांकांचे विक्रम : बायडन विजयाचे सकारात्मक पडसाद
वृत्तसंस्था/ मुंबई
अमेरिकेत नूतन राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या विजयाच्या प्रित्यर्थ भारतीय शेअर बाजाराने सोमवारी मोठी तेजी दर्शवली असून यापूर्वीचे विक्रम मोडीत काढण्यात यश मिळवले आहे. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजाराने दिवाळी आधीच दिवाळी साजरी केली आहे.
सेन्सेक्स 704 अंकांच्या वाढीसह 42597.43 वर आणि निफ्टीने 12461.05 वर बंद होत नवा विक्रम प्रस्थापित केला. निफ्टीने दिवसअखेर 197.50 अंकांची वाढ दर्शवली. सेन्सेक्सचा यापूर्वीचा 42273 अंकांचा आणि निफ्टीचा 12430 अंकांचा विक्रम मागे पडला आहे. आज दिवसभरात एका टप्प्यावर निफ्टी 42474 वर तर सेन्सेक्सचा निर्देशांक 42645.33 या नव्या विक्रमी अंकांवर झेपावला होता.
सोमवारी आयटी, बँक, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, रियल्टी, वित्त सेवा, खासगी बँका, धातू आणि माध्यम क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी तेजी दर्शवली होती.
सकाळचे सत्र
अमेरिकेत बायडन यांच्या निवडीचा जल्लोष जसा अमेरिकेत दिसला तसा तो भारतीय शेअर बाजारासह इतर बाजारांवरही दिसून आला. भारतीय शेअर बाजाराने आज चांगलीच उसळी घेतल्याचे दिसून आले.
आशियातील बाजारही तेजीत
आशियातील बाजारांमध्ये शांघाय, हाँगकाँग, सोल आणि टोकीयो यांनी सोमवारी 2.12 टक्के वाढ दर्शविली तर युरोपचे बाजारही प्रारंभीच्या समयी 2 टक्क्यांनी तेजी दर्शवत होते. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे दर 2.26 टक्क्यांनी वाढले होते.
या समभागात दिसली तेजी
सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 27 कंपन्यांच्या समभागांनी तेजी दर्शवली. सोमवारी इंडसइंड बँक 4.95 टक्के, भारतीय एअरटेल 4.92 टक्के, आयसीआयसीआय बँक 4.42 टक्के आणि ऍक्सीस बँकेचे समभाग 4.31 टक्के वाढीसह बंद झाले. सोबत इन्फोसिस, एचसीएल टेक, रिलायन्स आणि बजाज फायनान्स यांच्या समभागांनीदेखील तेजी दर्शवली. दुसरीकडे मारूती आणि आयटीसी घसरणीसह बंद झाले.
डॉलरच्या दबावात रुपया कमकुवत
स्थानिक बाजारात सोमवारी तेजी दिसली तरी मजबूत डॉलरच्या दबावाखाली सोमवारी रुपया 7 पैसे घसरून 74.15 प्रति डॉलरवर आला आहे. मागच्या वेळेस डॉलर 28 पैशांच्या मजबुतीसह 74.08 प्रति डॉलरवर राहिला होता. शेअर बाजाराची सुरूवात तेजीने झाली आणि त्याचा परिणाम म्हणून रुपयाही 13 पैसे तेजी राखत खुला झाला होता.