बँकिंग क्षेत्रातील समभागांचा आधार: निफ्टीत 110 अंकांची वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने तेजीचा कल कायम ठेवण्यात यश मिळवलं. बँकींग क्षेत्रातील समभागांच्या तेजीच्या जोरावर बीएसई सेन्सेक्स 448 अंकांच्या वाढीसह निर्देशांक 40,431 वर आणि निफ्टी 110 अंकांच्या वाढीसह निर्देशांक 11, 873 अंकांवर बंद झाला.
सुरुवातीच्या सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 300 अंकानी वाढ दर्शवत होता. त्याचप्रमाणे निफ्टीही 85 अंकांच्या वाढीसह कार्यरत होता. सकाळी 30 समभागांचा सेन्सेक्स 322.40 अंकांच्या वाढीसह 40305.38 अंकांवर तर निफ्टी 85 अंकांच्या वाढीसह 11848.25 अंकांवर तेजीच्या प्रवासात सामील होता. रियल्टी क्षेत्रातील समभाग सोमवारी तेजीत होते. या व्यतिरीक्त धातू आणि एफएमसीजी क्षेत्रात खरेदी दिसून आली. निफ्टीतील 42 कंपन्यांचे समभाग सोमवारी वधारलेले होते तर 8 कंपन्या नुकसानीत होत्या. सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी एक सत्र वगळल्यास आतापर्यंत 12 सत्रात तेजी कायम ठेवल्याचे दिसून आले आहे. ऑटो, माहिती तंत्रज्ञान आणि फार्मा क्षेत्रात विक्रीचा दबाव दिसून आला. सोमवारी आयसीआयसीआय सर्वात लाभात राहिलेली पाहायला मिळाली. आयसीआयसीआय बँकेच्या समभागात 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. यांच्यासोबत ऍक्सिस बँक, नेस्ले इंडिया, एसबीआय, एचडीएफसी, ओएनजीसी आणि कोटक बँक यांनीही तेजी दाखवून दिली. बँकिंग क्षेत्रातील तेजीने आज शेअर बाजाराला खऱया अर्थाने मजबुतीसाठी आधार दिला. दुसरीकडे बजाज ऑटो, टीसीएस, भारती एअरटेल, महिंदा आणि महिंद्रा तसेच मारुती यांचे समभाग नुकसानीत राहिले.
मागच्या शुक्रवारी दोन्ही बाजार तेजीच्या नोंदीसह बंद झाले होते. सेन्सेक्स 254 अंकांनी आणि निफ्टीचा निर्देशांक 82 अंकांनी वाढ दर्शवून बंद झाला होता.
दरम्यान इतर आंतरराष्ट्रीय बाजारांचा विचार करता चांगली तेजी पाहायला मिळाली. हाँगकाँग, टोकियो आणि सेऊल यांचे बाजार तेजी दर्शवत बंद झाले. तर शांघाय मात्र नुकसानीत बंद झाला.