अर्थसंकल्पावर नजर ठेवणाऱया शेअर बाजारात आज मात्र तेजीचाच सूर दिसून आला. अर्थसंकल्प सादरीकरणानंतर बीएसई सेन्सेक्सने 2 हजार अंकांची उसळी घेतली. सकाळपासूनच आज शेअर बाजार तेजीसह कार्यरत होता. दुपारी 2 हजार 20 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स निर्देशांक 48,306.59 वर कार्यरत होता. बजेटच्या भाषणानंतर सेन्सेक्सची ही विक्रमी तेजी आहे. निफ्टी निर्देशांक 563 अंकांच्या वाढीसह 14,198.40 अंकांवर कार्यरत होता. बाजारात बँकिंग क्षेत्रातील समभाग तेजीत होते. निफ्टी बँक निर्देशांक 7.21 टक्के वाढीसह 32,768.70 अंकावर कार्यरत होता.
बीएसईवरील 2 हजार 981 समभागांमध्ये 1 हजार 815 समभाग तेजीत होते. लिस्टेड कंपन्यांचे भांडवली मूल्य वाढून 191.47 लाख कोटींवर पोहचले. याआधी शेअर बाजार सलग 6 सत्रात घसरणीसह बंद झाला होता. विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचे सुतोवाच अर्थमंत्र्यांनी करताच या क्षेत्रातील समभागांमध्ये तेजी दिसली आहे. एचडीएफसीचे समभाग 5 टक्के, एसबीआय लाइफचे 3 टक्के तर आयसीआयसीआयचे समभाग 6 टक्के तेजी दर्शवत होते.