सेन्सेक्समध्ये 478 अंकांची वाढ, इंडसइंड बँक सर्वाधिक तोटय़ात
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने तेजीसह बंद होण्यात यश मिळवलं आहे. शेअर बाजारात इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक घसरणीत दिसले.
सोमवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सरतेशेवटी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 478 अंकांच्या वाढीसह 60,545.61 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांकाने 151 अंकांच्या वाढीसह 18,068.55 अंकांवर बंद झाला. इंडसइंड बँकेचे समभाग 10 टक्के इतकी घसरणीसह 1063 रुपयांवर बंद झाले होते. बँकिंग समभागांमध्ये मिळताजुळता कल दिसून आला. कॅनरा बँकचे समबाग 5 टक्के वाढीसह 242 रुपयांवर झेपावलेले दिसले. तर दुसरीकडे घडय़ाळ उद्योगातील दिग्गज कंपनी टायटनचे समभाग सोमवारी बाजारात 4 टक्के इतके तेजीसह 2 हजार 543 रुपयांवर पोहचले होते. बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा आणि इंडियन ऑइलचे समभाग तेजीत होते. निफ्टीतील 50 पैकी 10 समभाग घसरणीत होते.
सोमवारी सकाळी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स निर्देशांक तेजीसह खुला झाला. 318 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 60,385 अंकांवर सकाळी खुला झाला होता. पण व्यवहारात काही वेळानंतर मात्र बाजारात घसरण अनुभवायला मिळाली. 150 अंकांची घसरण सेन्सेक्स निर्देशांकात दिसली. दिवाळी दिवशी विशेष मुहूर्त टेडिंग दिवशी बाजार तेजीसह 60 हजार अंकांवर बंद झाला होता.
सोमवारी इंडसइंड बँकेचे समभाग 13 टक्के इतके घसरले. समभागाचा भाव 1045 रुपयांवर घसरला. शुक्रवारी 84 हजार लोकांना सहमतीशिवाय कर्ज दिले गेल्याची बातमी माध्यमावर फिरत होती. त्यामुळेच सोमवारी इंडसइंड बँकेच्या समभागावर त्याचा नकारात्मक परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
चार दिवस बाजार बंद
दरम्यान, दिवाळीच्या निमित्ताने मागच्या आठवडय़ात बाजाराला गुरुवार व शुक्रवारी सुटी होती. त्यानंतर शनिवार व रविवार बाजार बंदच असतो. म्हणजेच मागच्या आठवडय़ात चार दिवस बाजार बंद होता. ही मोठी सुटी बाजाराने अनुभवली.
दरम्यान सोमवारी व्यवहारादरम्यान सन फार्मा, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डीज लॅब्स व महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग घसरणीत होते. लार्सन टुब्रो, कोटक महिंद्रा बँक, टायटन व मारुती सुझुकीचे समभाग मात्र तेजीत होते. निफ्टी निर्देशांकात इंडसइंड बँक, डिव्हीस लॅब व सन फार्माचे समभाग घसरणीत होते.