सेन्सेक्स 145 तर निफ्टी निर्देशांक 30 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात पुन्हा तिसऱया सत्रात बुधवारी घसरणीचे वातावरण राहिल्याचे दिसून आले. यामध्ये दिवसभरात मोठय़ा प्रमाणात चढउताराची स्थिती राहिल्याने बीएसई सेन्सेक्स 145 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. मुख्य स्वरुपात बँक, धातू आणि वाहन कंपन्यांच्या समभागात विक्री राहिल्याने सेन्सेक्स-निफ्टीचा निर्देशांक घसरला.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमुळे तिसऱया सत्रात सेन्सेक्स 145.37 अंकांनी घसरुन 57,996.68 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 30.25 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,322.20 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये एनटीपीसी, स्टेट बँक, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स यांचे समभाग प्रामुख्याने नुकसानीत राहिले आहेत. 30 समभागांमध्ये 22 समभाग नुकसानीसह बंद झाले.
जगभरातील वातावरणाचा परिणाम?
जगभरात मागील काही दिवसांपासून विविध प्रश्नांमुळे वातावरण गढूळ झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने युक्रेनवर रशिया हल्ला करण्याचे संकेत होते परंतु ते आता काहीसे कमी झाल्यामुळे आशियासह अन्य बाजारांमधील वातावरण तेजीत राहिले होते. यामध्ये जागतिक पातळीवर कच्चे तेल 0.19 टक्क्यांनी घसरुन 93.06 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. तसेच शेअर बाजारातील आकडेवारीनुसार, विदेशी संस्थांकडून गुंतवणूक भांडवली बाजारात राहिल्याने जवळपास 2,298.76 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रमुख क्षेत्रांची स्थिती
बुधवारच्या सत्रात मुख्य क्षेत्रांमध्ये बँक, धातू आणि वाहन क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागांची विक्री झाली. यामुळे भारतीय बाजारात नकारात्मक स्थिती राहिली होती, असे शेअर बाजारातील तज्ञांनी सांगितले आहे.