कोरोना लस परवानगीने बाजार तेजीत : टेक कंपन्या नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
भारत सरकारने कोवीशिल्ड व कोवॅक्सीन या दोन कोरोनासंबंधीत लसींना तातडीच्या वापराकरीता परवानगी दिल्याने शेअर बाजाराने नव्या वर्षातील पहिल्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी नवी विक्रमी झेप घेण्याचा पराक्रम केला. सेन्सेक्सने 48 हजाराचा विक्रमी टप्पा पूर्ण केला आहे.
भारतात कोरोना लस दाखल होण्याच्या बातमीने सोमवारी सकाळी भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरूवात केली. आयटीसी, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक यांच्या जोरावर बाजाराने गती प्राप्त केली होती. लसीला मिळालेल्या मंजुरीमुळे आज शेअर बाजार खुशीत दिसत होता. सोमवारी सरतेशेवटी बीएसई सेन्सेक्स 307.82 अंकांच्या वाढीसह निर्देशांक 48,176.80 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीचा निर्देशांक 114.40 अंकांच्या वाढीसह 14,132.90 वर बंद झाला. युरोपियन बाजारांनीही दमदार सुरूवात केल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसला. आयटी क्षेत्रातल्या समभागांनी आज बाजारात तेजी अनुभवली. त्यांच्या तिमाहीतील चांगल्या निकालाचा परिणाम समभागाचे भाव वाढण्यात दिसला. सेन्सेक्सने आज सकाळच्या सत्रात 48,220 चा उच्चांकी टप्पा गाठला होता तर दुसरीकडे निफ्टीनेही 14,148 पर्यंत मजल मारली होती. टेक कंपन्या टीसीएस, एचसीएल टेक आणि इन्फोसिस यांचे समभाग 2 ते 4 टक्के इतके वाढल्याचे दिसले. पोलाद कंपन्या टाटा स्टील व हिंडाल्को यांनी निफ्टी निर्देशांकात 7 ते 8 टक्क्यांची वाढ दर्शवली होती. बाजारात ओएनजीसी, एसबीआय, एल अँड टी व इन्फोसिस, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक यांनी तेजी दर्शवली. बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंटस्, एचडीएफसी बँक आणि हिरो मोटोकॉर्प या कंपन्या नुकसानीत होत्या. मागच्या शुक्रवारी सेन्सेक्स 117 टक्के वाढीसह 47,868.98 वर तर निफ्टी 14,018.50 वर बंद झाला होता. परदेशी गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 506.21 कोटींचे शेअर्स खरेदी केले होते.