वार्ताहर/ कुडची
कुडची रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता बेळगाव-शेडबाळ जनसाधारण पॅसेंजर गाडीचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी कुडचीचे आमदार पी. राजीव, रायबागचे आमदार डी. एम. ऐहोळे व रेल्वेचे हुबळी विभागाचे डी.आर.एम. अरविंद मालखेडे उपस्थित होते.
यावेळी आमदार राजीव म्हणाले, कुडची-बागलकोट नवीन मार्गाला लवकरच प्रारंभ होणार असून येत्या दोन वर्षात मोठा विकास होणार आहे. अजमेरच्या गाडय़ांना थांबा देणे, आर.पी.एफ.जी.आर.पी. औटपोस्ट निर्माण करणे, आरक्षण खिडकी उघडणे त्याबरोबर अन्य मागण्या त्यांनी केल्या.
रायबागचे आमदार डी. एम. ऐहोळे म्हणाले, शेडबाळ-बेळगाव पॅसेंजर गाडीची वेळ बदलावी, शेडबाळहून 4.15 वाजता सुटण्याऐवजी 6 च्या दरम्यान सोडावी. ती गाडी बेळगावला 8 पर्यंत पोहोचते. तेथून नऊ वाजता बेंगळूरला जाण्यास अनुकूल होते. यामुळे बेळगावात वेळ जाणार नाही. याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
रेल्वेच्या हुबळी विभागाचे डी.आर.एम. अरविंद मालखेडे यांनी बोलताना, ही गाडी बेळगावहून सकाळी 7.10 ला सुटून शेडबाळला 9.20 ला पोहचणार आहे. पुन्हा शेडबाळहून 4.15 ला सुटून 7 वाजता बेळगावला पोहचणार आहे. लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेण्याचा भरवसा त्यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांना निवेदने देण्यात आली.
यावेळी रावसाहेब पाटील, सय्युम पटाईट, आण्णासाब खेमलापूरे, अंकुश जाधव, सोहेल जिनाबडे, इक्बाल कोले, तुराबुद्दीन जिनाबडे, मोहद्दीनस वाटे, मोहन लोहार, दयानंद मठपती, सरफराज करीमखान, रेल्वेचे पी.आर.ओ. प्राणेशसह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.