शेतकरी नेत्यांच्या हत्येच्या कटाची कबुली : त्यानंतर व्हिडीओद्वारे वेगळाच पर्दाफाश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान शुक्रवारी रात्री योगेश नामक एका संशयिताला पकडण्यात आल्याने खळबळ उडाली. सोनिपत पोलिसांनी संबंधित संशयिताला अटक केली आहे. सदर संशयिताने चार शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या. तसेच आंदोलक शेतकऱयांमध्येही भीतीची लाट पसरली. तथापि, शनिवारी त्याच व्यक्तीचा नवा व्हिडीओ समोर आला असून शेतकऱयांच्या सांगण्यानुसार आपण प्रसारमाध्यमांसमोर बोलल्याचे स्पष्टीकरण त्याने दिल्याने या संपूर्ण प्रकरणावरून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. संशयिताचा नवा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून, आपण शेतकऱयांनी सांगितल्याप्रमाणे वक्तव्य केल्याचा दावा केला आहे. मात्र, हा व्हिडीओ अधिकृत असल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही.
आंदोलक शेतकऱयांकडून प्रजासत्ताक दिनी ट्रक्टर रॅलीची तयारी सुरू असताना शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट असल्याचा हा खळबळजनक प्रकार उजेडात आला होता. आंदोलन सुरू असलेल्या परिसरात पकडण्यात आलेल्या संशयिताने हत्येच्या कटाचा गौप्यस्फोट केला होता. ट्रक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळय़ा घालण्याचा कट आखल्याचे त्याने म्हटले होते. मात्र, आता त्याने आपल्या पूर्वीच्या विधानांवरून माघार घेतल्याची माहिती उजेडात आली आहे.
अटकेनंतर संशयिताने संपूर्ण कटाचा उलगडा केला होता. आमचे दोन गट तयार केले होते. 19 जानेवारीपासून आम्ही आंदोलनस्थळी होतो. शेतकरी सोबत शस्त्र बाळगतात का याचाही शोध आम्ही घेत होतो, असे त्याने स्पष्ट केले होते. दुसरीकडे आमचा दहा जणांचा एक गट कार्यरत आहे. हा गट शेतकऱयांच्या रॅलीत सहभागी होऊन पाठीमागून गोळीबार करतील. जेणेकरून आंदोलक घाबरून पांगतील. त्याचबरोबर व्यासपीठावर जे चार लोक असतील, त्यांना गोळय़ा घालण्याचा कट असल्याचेही त्याने म्हटले होते.