नवा राजकीय पक्ष पंजाबमध्ये सर्व 117 जागा लढवणार
चंदिगढ / वृत्तसंस्था
मागील वर्षभर दिल्लीच्या सीमेवर चाललेल्या शेतकरी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणारे भारतीय किसान युनियनचे नेते गुरनाम सिंग चदुनी यांनी शनिवारी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चदुनी यांनी संयुक्त संघर्ष पार्टी या पक्षाची स्थापना केली आहे. शनिवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी नवा राजकीय पक्ष आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व 117 जागा लढणार असल्याचे जाहीर केले.
शेतकरी नेते गुरनाम सिंग चदुनी हे वर्षभरापेक्षा अधिक काळ चाललेल्या दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणात लोकांना एकत्र करण्यात मोठी भूमिका निभावली होती. आता त्यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत शेतकरी नेत्यांना उतरवण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. सध्याचे राजकारणी बरबटलेले आहेत. आमचा उद्देश राजकारणाची शुद्धता करणे आणि चांगल्या लोकांना पुढे आणणे हा आहे. सध्याचे राजकीय नेते भांडवलदारांना प्रोत्साहन देत आहेत आणि भांडवलादारांच्या हिताचीच धोरणे तयार करतात. यावेळी ते गरिबांच्या हिताकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच आम्ही ‘संयुक्त संघर्ष पार्टी’ या नव्या पक्षाची घोषणा करत आहोत. संयुक्त संघर्ष पार्टी एक धर्मनिरपेक्ष पक्ष असेल. हा पक्ष समाजातील सर्वांच्या कल्याणासाठी काम करेल, असे गुरनाम सिंग चदुनी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.