प्रतिनिधी / सांगली
कोरोनामुळे वेळोवेळी पुढे ढकललेली शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेची कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक तीन ते पाच सप्टेंबर या कालावधीमध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट येथील सातपुडा हॉल येथे होणार आहे. अशी माहिती संघटनेचे नेते संजय कोले यांनी दिली. या कार्यकारणी बैठकीत तीन सप्टेंबरला प्रसिद्ध अर्थशास्त्री, नेते, युगात्मा शरद जोशी यांच्या ८६ व्या जयंतीचा कार्यक्रम होणार आहे. चार सप्टेंबर रोजी सर्व जिल्ह्यातील शेती प्रश्नांचा आढावा, तसेच स्थानिक व व्यापक आंदोलनाचे निर्णय, स्वतंत्र भारत पक्षाची संघटनात्मक उभारणी या विषयावर चर्चा होणार आहे.
पाच सप्टेंबर रोजी नेत्यांचे निर्देश असे कार्यक्रम होणार असून बैठकीत कापूस, ज्वारी, कांदा, ऊस, साखर, इथेनॉल धोरण, जैव परावर्तित बियाणे, नवे कमी कायदे, डाळीवरील साठा मर्यादा, सोया पेंडीची आयात, महापुरामुळे नुकसान, कर्ज धोरण, आंतरराष्ट्रीय व्यापार, सहकार, महिला व युवकांचे प्रश्नावर चर्चा होणार आहे.
बैठकीला माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर,शेतकरी संघटना टस्ट कार्याध्यक्ष गोविंद जोशी, गुणवंत पाटील, ललित बहाले अनिल घनवट, गीता खांदभराड संजय कोले, नवनाथ पोळ, शीतल राजोबा, राम कणसे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.