प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या साक्षिने राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज व शाहू ग्रूपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी सर्वसामान्य जनता व बळीराजाच्या विविध प्रश्नांसाठी रणरणत्या उन्हात बुधवारी लाक्षणिक उपोषण केले. जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून पाठींबा देण्यासाठी संस्था-संघटनासह नागरिकांची दिवसभर रीघ लागली होती. या आंदोलनामध्ये त्यांच्या पत्नी नवोदिता घाटगे, बंधू वीरेंद्रराजे घाटगे, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लॉकडाऊन काळातील विजबिल माफ करणे, प्रामाणिक शेतकर्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान, दोन लाखांवरील कर्जमाफी, शेती पंपाची वीजबिल माफी व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना वाढीव मदत या राज्यातील तमाम शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे उपोषण केले.
सकाळी 8.30 वाजता घाटगे यांनी कुटुंबियांसह अंबाबाईचे दर्शन घेतले. दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर उपोषणास प्रारंभ केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी `राजर्षी शाहू महाराज की जय’ या घोषणांनी दसरा चौक दुमदुमून सोडला होता.
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिवसभर दसरा चौकात शेतकर्यांनी एकच गर्दी केली होती. जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून शेतकर्यांचे जथ्थेच्या जथ्थे आंदोलनस्थळी येत होते. `समरजितसिंह घाटगे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार संपतबापू पाटील, इंदौर गादीचे संस्थानिक राजे भूषणसिंह होळकर, स्वर्गिय गंगाराम कांबळे यांचे नातू अरुण कांबळे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, अखिलेशराजे घाटगे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्यासह हजारो शेतकरी दसरा चौकात पाठिंबा देण्यासाठी एकवटले होते.
राजघराण्याचे पहिलेच उपोषण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागलच्या घाटगे घराण्यातील, समरजितसिंह घाटगे यांना शाहू महाराज नात्याने पणजोबा लागतात. राज्यातील तमाम सर्वसामान्य जनता व शेतकरी रयतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी पणजोबांच्या पुतळ्या जवळ पणतू उपोषणाला बसले. राजघराण्यातील एखादी व्यक्ती अशा पद्धतीने उपोषणाला बसण्याची ही पहिलीच घटना असल्याची चर्चा उपस्थित शेतकर्यांमध्ये होती.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा विधान सभेतील विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले. शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्ष नेता म्हणून आपली भूमिका सभागृहात मांडू. सरकारला जागे करण्यासाठी विविध पातळ्यांवर आंदोलनाची धार कायम ठेवा. उपेक्षित, अन्याय झालेल्या शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत लढत राहुया, अशा शब्दात फडणवीस यांनी समरजीत घाटगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.