सोयाबिन दरात वाढ करावी, ऊसदर निश्चित करावा, शेतकऱयांची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ातील साखर कारखान्यांनी शेतकऱयांचे कोटय़वधी रुपये देणे बाकी आहे. त्यासाठी शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन ती रक्कम द्यावी, अशी मागणी केली. महत्त्वाचे म्हणजे आणखी एक महिन्यामध्ये नव्याने गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे. तेव्हा आताच 2021-22 सालचा ऊस दर जाहीर करावा. सोयाबिनचे अचानकपणे कमी केलेले दर वाढवावेत, महापुरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱयांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, आदी मागण्यांसाठी शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले आहे.
कोरोनामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. सोयाबिनचे दर अचानकपणे कमी केल्यामुळे शेतकरी अडचणीत आले. तातडीने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून किमान 9 हजार रुपये क्विंटलप्रमाणे सोयाबिन दर द्यावा, अशी मागणी केली. अजूनही काही साखर कारखान्यांनी ऊसबिले दिलेली नाहीत. तेव्हा तातडीने ती द्यावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
ऊस दर आताच जाहीर करणे गरजेचे आहे. कारण ऊस दर जाहीर झाल्यानंतर शेतकऱयांना दरवषी ऊस दरासाठी झगडावे लागत आहे. आंदोलन केल्यामुळे पुन्हा शेतकऱयांनाच फटका बसत आहे. तेव्हा प्रतिटन चार हजार रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. तो दर देण्यास भाग पाडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बऱयाच साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षाही कमी दर दिल्याची तक्रार यावेळी शेतकऱयांनी केली.
सध्याची वाढती महागाई आणि कोरोना यामुळे शेतकऱयाला शेती करणे अवघड बनले आहे. खतांचे दर गगनाला भिडले आहेत. याचबरोबर मजुरीमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे उसाच्या दरामध्ये वाढ होणे गरजेचे आहे. साखर कारखान्यांनीही याचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. साखर आयुक्त कार्यालय बेंगळूर येथे असल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा साखर आयुक्त कार्यालय बेळगाव येथे स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली. चुन्नाप्पा पुजेरी, अशोक यमकनमर्डी यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
बेंगळूर येथे असलेले साखर आयुक्त कार्यालय बेळगाव येथे हलविण्याची मागणी शेतकऱयांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. याचबरोबर मुख्यमंत्र्यांसमोरही आंदोलन करण्याची तयारीही त्यांनी सुरू केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱयांशी संपर्क साधून बेळगावात लवकरच साखर आयुक्त कार्यालय हलवू असे आश्वासन दिले.