योगेंद्र यादवांचा दावा : दिल्ली पोलीस आयुक्तांची सतर्क राहण्याची सूचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
26 जानेवारी रोजी ट्रक्टर मोर्चा काढण्यासाठी शेतकऱयांनी स्वतःचा मार्ग दिल्ली पोलिसांना कळविला आहे. शेतकरी आंदोलनाशी संबंधित स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी रविवारी संध्याकाळी ट्रक्टर मोर्चाला अनुमती मिळाल्याचा दावा केला आहे. दिल्ली पेलिसांसोबत रविवारी बैठक झाली असून ट्रक्टर मोर्चाला औपचारिक अनुमती मिळाली आहे. 26 जानेवारी रोजी होणारे किसान प्रजासत्ताक संचलन शांततेत होणार आहे. शेतकऱयांनी दिल्लीत केवळ ट्रक्टरच आणावा, ट्रॉली आणू नये आवाहन करत असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.
याचदरम्यान दिल्ली पोलीस आयुक्तांचे विधान समोर आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या सुरक्षेत तैनात सर्व अधिकारी आणि सशस्त्र दलांनी सज्ज रहावे, शेतकऱयांच्या ट्रक्टर मोर्चादरम्यान कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
63 कि.मी.चा मोर्चा
मोर्चासंबंधी शेतकरी संघटना आणि दिल्ली पोलीस यांच्यात शनिवारीही चर्चा झाली होती. या चर्चेत दिल्ली पोलिसांनी सिंघू सीमेवरून खरखौदा टोलनाक्याचा मार्ग मोर्चासाठी मांडला होता. हा मार्ग 63 किलोमीटर अंतराचा आहे.
शेतकऱयांनी 26 जानेवारीच्या टॅक्टर मोर्चाला किसान गणतंत्र परेड हे नाव दिले आहे. भारतीय किसान युनियनचे युद्धवीर सिंग यांनी मार्गासंबंधी माहिती दिली आहे. सिंघू सीमेवरून दिल्लीत 10 किलोमीटर आतमध्ये दाखल होऊ. यानंतर संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर, बवाना, कंझावाला, कुतुबगढमार्गे चंदी सीमेवर पोहोचू. त्यानंतर हरियाणात दाखल होऊ आणि परत सिंघू सीमेवर येणार आहोत. 100 किलोमीटरच्या या मोर्चात 45 किलोमीटरचा मार्ग हिस्सा दिल्लीत असल्याचे सिंग यांनी सांगितले आहे.
शेतकरी सुमारे महिन्याभरापासून ट्रक्टर मोर्चाची तयारी करत आहेत. पंजाबमधील अनेक शहरे आणि गावांमध्ये याची रंगीत तालीम केली जात आहे. पंजाबच्या अनेक जिल्हय़ांमधून शेतकरी ट्रक्टरसह दिल्लीसाठी रवाना होत आहेत.
ट्रक्टर मोर्चादरम्यान पाकिस्तानचा कट
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱयांच्या ट्रक्टर मोर्चात अनुचित प्रकार घडविण्याच्या मोठय़ा कटाचा पर्दाफाश दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनुसार मोर्चात अनुचित प्रकार घडवून आणण्याचा हा कट पाकिस्तानातून रचण्यात आला आहे.
ट्रक्टर मोर्चात गोंधळ घडवून आणण्याचे कट रचण्यात येत असल्याची माहिती वारंवार मिळत आहे. या मोर्चात गोंधळ घडवून आणला जाण्याचा धोका आहे. गोंधळ तसेच गडबड घडवून आणण्यासाठी पाकिस्तानात 308 नवे ट्विटर हँडल तयार करण्यात आले आहेत अशी माहिती दिल्ली पोलिसाचे विशेष गुप्तचर आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी दिली आहे. पोलिसांकडून या ट्विटर हँडल्सची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
13 जानेवारी ते 18 जानेवारीदरम्यान समाजमाध्यम विश्लेषणातून टॅक्टर मोर्चात गोंधळ घडवून आणणे, अफवा पसरविण्यासाठी 308 ट्विटर हँडल्स पाकिस्तानात तयार झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे हस्तक यावर सातत्याने काम करत आहेत. देशातील अनेक ठिकाणांमधून मोर्चावेळी गडबळ तसेच कायदा-सुव्यवस्थेसंबंधी आव्हान उभे करण्यात येणार असल्याचे इनपूट मिळत असल्याचे पोलीस अधिकारी पाठक म्हणाले.