ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांकडून निघणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीविरोधात दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती, पण न्यायालयाने त्याला 20 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता 20 जानेवारीला सुनावणी होणार आहे. दिल्ली पोलिसांच्या वतीने न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
यापूर्वी सुनावणीदरम्यान न्यायालयाने संकेत दिले होते की, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला थांबवण्याचे काम प्रशासन करू शकते. न्यायालयाने रॅली थांबवण्याचा आदेश दिला तर त्यामधून वेगळा संदेश जाऊ शकतो. रामलीला मैदानावर निदर्शने करण्याच्या परवानगीबाबत दिल्ली पोलिसांनाच निर्णय घ्यावा लागेल. तसेच या ठिकाणी किती लोक येतील, हे देखील पोलीस ठरवतील, असेही न्यायालयाने सांगितले.