उपविभागीय कृषि अधिकारी अजित आडसुळे यांचे आवाहन
ओटवणे /प्रतिनिधी-
सध्या भात पिकावर भात करपा व निळे भुंगेरे या रोगांचा प्रादुर्भाव होत असून शेतकऱ्यांनी करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम तर निळे भुंगेरेसाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रिन या औषधांची फवारणी करावी. तरीही भात पिकावरील रोग व कीड आटोक्यात न आल्यास पुन्हा पंधरा दिवसांनी औषधांची फवारणी करावी. मात्र प्रमाणापेक्षा जास्त औषधाचा वापर करू नये असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी अजित आडसुळे यांनी केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी रूपाली पापडे यानी भात पिकावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम ५० टक्के प्रवाही १० ग्रॅम १० ली.पाण्यातून तर निळे भुंगेरे रोगासाठी ५ टक्के प्रवाही लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ६.२५ मिली १० ली. पाण्यातून फवारणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाडगे यांनी भात पिकावरील कीड व रोग प्रतिबंधात्मक फवारणीबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली. कृषी सहायक मिलिंद निकम यांनी शेतक-यांनी फवारणीवेळी योग्य ती स्वतःची काळजी घेऊनच फवारणी करावी असे आवाहन केले.