प्रतिनिधी /बेळगाव
गवताचा भारा घेवून घराकडे निघालेल्या शेतकऱ्याला अडवून त्याच्या गळय़ातील चेन हिसकावून घेवून फरारी झालेल्या तिघा जणांना कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे. 10 दिवसांपूर्वी देवरशिगीहळ्ळी येथे ही घटना घडली होती.
नागेश श्रीशैल दोडमनी, विजय नागय्या मदनभावी, चेतन बसय्या हिरेमठ (सर्व रा. देवरशिगीहळ्ळी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. त्यांच्याजवळून 1 लाख 40 हजार रुपये किंमतीची 35 ग्रॅमची चेन जप्त करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ही माहिती दिली आहे.
रामनगौडा निलकंठगौडा पाटील (रा. देवरशिगीहळ्ळी) हा शेतकरी 23 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता गवताचा भारा घेवून घरी येत होता. त्यावेळी त्याला अडवून तिघा जणांनी 35 ग्रॅमची चेन पळविली होती. पोलिसांनी चेन व गुह्यासाठी वापरलेली केए 22 वाय 1521 क्रमांकाची पल्सर मोटार सायकल, दोन मोबाईल जप्त केले आहे.