दुबईतील फुड कंपनीने दोन कोटी, 80 लाखांची केली होती फसवणूक
प्रतिनिधी / मिरज
दुबईस्थित जान जबेल अल नज्जार फुड्स ट्रेडींग कंपनीने शहरातील विद्यानगर येथे राहणाऱ्या पांडूरंग रामचंद्र जगताप या शेतकऱ्याची दोन कोटी, 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दुर्गाप्रसाद सत्यनारायण कुणा (रा. रामालय मंदिराजवळ, अतिली, जि. वेस्ट गोदावरी, आंधप्रदेश) याला महात्मा गांधी चौकी पोलिसांनी आंध्रप्रदेश येथून अटक केली आहे. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान सदर कंपनीचा मालक सुबित आणि आनंद देसाई यांचाही शोध घेतला जात असल्याची माहिती महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पांडूरंग जगताप हे द्राक्षबागायतदार शेतकरी आहेत. दुबईतील जान जबेल अल नज्जार फुड्स ट्रेडींग कंपनीने त्यांच्याकडून तीन कोटी, पाच लाखांची द्राक्ष खरेदी केली होती. त्यापैकी केवळ 25 लाख रुपये जगताप यांना दिले होते. मात्र, उर्वरीत 2 कोटी, 80 लाख रुपयांची रक्कम दिली नव्हती. वारंवार पैशांची विचारणा करुनही टाळाटाळ केली जात होती.
सदर कंपनीचा संपर्कच बंद झाला होता. त्यामुळे जगताप यांनी आपली दोन कोटी, 80 लाखांची फसवणूक झाली असल्याची फिर्याद महात्मा गांधी चौकी पोलिस दिली होती. त्यानुसार दुर्गाप्रसाद सत्यनारायण कुणा, सुबिथ आणि आनंद देसाई या तिघांवर गुन्हा दाखल झाला होता.