मंत्री शंभूराज देसाईंवरील आरोपांमुळे जिल्हय़ात खळबळ,
वार्ताहर/ कुडाळ
साताऱयाचे पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी शेत जमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा आरोप विरोधी पक्षानं केला आहे. त्यामुळे जिल्हय़ाच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. ठाकरे गटाने केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचा खुलासाही मंत्री शंभूराज देसाई यांनी केला असून मी कोणत्याही चौकशीस तयार असल्याचेही त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील नावली येथील शेतजमिनीत मंत्री शंभूराजे देसाई यांनी अवैध बांधकाम केल्याचा आरोप होत आहे. तसेच निवडणूक शपथपत्रात या जमिनीचा शेतजमीन म्हणून उल्लेख आहे. पंरतु प्रत्यक्षात या जमिनीवर निवासी बांधकाम केले आहे. सातबारा उताऱयावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही. सदरची जमीन ही इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असल्याने बांधकामास परवानगी नव्हती. परवानग्या न घेता घराचं अवैध बांधकाम केले आहे. अवैध बांधकाम केल्यामुळे त्यांचं पद रद्द होण्यास पात्र आहे. सदर जमीन ही शंभूराज देसाईंच्या नावावर आहे हा आरोप ठाकरे गटाने केला आहे. ही जागा शंभुराज देसाईंनी 10 वर्षांपुर्वी खरेदी केल्याचं सांगण्यात येत असून हा बंगला सुमारे 6 ते 7 वर्षांपुर्वी बांधल्याची प्राथमिक माहिती भालगेवाडीच्या ग्रामस्थांनी सांगितली आहे.