कोरेगावच्या तत्कालीन तहसीलदारांच्या पतीच्या पळशी स्टेशन येथील शेततळय़ात दुर्घटना
वार्ताहर/ कोरेगाव
कोरेगावच्या तत्कालीन तहसीलदार स्मीता पवार यांचे कारकिर्दीत पळशी स्टेशन (ता. कोरेगाव) येथे त्यांचे पती प्रदीप बाबुराव पवार (रा. सागांव ता. वाळवा जि. सांगली) यांनी पळशी स्टेशन येथे खरेदी केलेल्या 10 एकर शेतजमिनीत शेततळे बांधले असून शेतीच्या देखभालीसाठी बीडकडील एक सहकुटुंब जोडपे ठेवले होते. ते शेतातील खोलीत राहण्यास आहेत. दि. 20 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याचे सुमारास शेतीच्या देखभालीसाठी ठेवलेल्या हातागळे कुटूंबातील 9 वर्षांचा मुलगा पृथ्वीराज होणाजी हातागळे हा शेततळ्याच्याजवळ खेळत असताना शेततळ्याचे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या अकस्मात घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोरेगावच्या तत्कालीन तहसीलदार स्मिता पवार यांचे कार्यकाळात त्यांचे पती प्रदीप बाबुराव पवार यांनी पळशी स्टेशन येथे वाघजाई नावाचे शिवारात 10 एकर शेतजमीन खरेदी केली आहे. सदर क्षेत्रात सुमारे 30 गुंठय़ात शेततळे असून त्यात भरपूर पाणी असते. शेततळ्यातील पाण्याचा वापर प्रदिप पवार यांच्या शेतीसाठी केला जातो. शेतीवर काम करण्यासाठी द्रौपदी होणाजी हातागळे (वय 32) व त्यांच्या मुली कु. प्रतिक्षा, कु. दिक्षा, कु. साक्षी, कु. प्रती व मुलगा पृथ्वीराज होणाजी हातागळे वय 9 वर्षे असे एकत्रित मूळगाव काडीवडगाव (ता. वडवणी जि. भीड, हल्ली रा.पळशी ता.कोरेगाव) हे शेतातील खोलीवर राहण्यास आहेत. घटनेची खबर निखील सुरेश गायकवाड रा. शिंदेवस्ती ( बर्गेवाडी पो. खेड, ता. कोरेगाव यांनी सातारारोड पोलीस दूरक्षेत्रात दिली असून त्यांचे म्हणण्यानुसार ही जमीन माझा चुलत भाऊ अमोल हणमंत गायकवाड रा. शिंदेवस्ती (बर्गेवाडी) हा खंडाने करतो. मी त्याला शेतीसाठी मदत करीत असतो. चुलत भाऊ अमोल गायकवाड याने मला सोमवारी सकाळी फोनवरून प्रदीप पवार यांचे शेततळ्यात 9 वर्षाच्या पृथ्वीराजचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर घटनेची खबर सातारारोड पोलीस दूरक्षेत्रात देताच पोलिसांनी घडनास्थळी भेट देऊन पृथ्वीराजचा मृतदेह शेतळ्यातून बाहेर काढून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कोरेगावला पाठवला आहे. अकस्मात मृत्यू म्हणून पोलीस दफ्तरी नोंद झाली असून पोलीस निरीक्षक कदम पुढील तपास करीत आहेत.
घटनेची माहिती कळताच सध्या पुणे विभागात कार्यरत असलेल्या तहसीलदार स्मिता पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. तीन वर्षांपूर्वी त्या कोरेगाव येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. गरीब हातागळे कुटुंबातील चार मुलींत एकुलता एक एक असलेल्या पृथ्वीराज या एकुलत्या मुलाचा मृत्यू पाहून हातागळे कुटुंबाचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.