प्रतिनिधी / बेळगाव
अगसगे (ता. बेळगाव) येथील चंद्रू देसाई या शेतकऱयाच्या शेतातून सोयाबिन चोरल्याच्या आरोपावरून काकती पोलिसांनी राजगोळी (ता. चंदगड) येथील एका युवकाला अटक केली आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
कल्लाप्पा शंकर शिंदे (वय 30, रा. राजगोळी) असे त्याचे नाव आहे. काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. त्याच्याकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली केए 22/4990 क्रमांकाची ऑटोरिक्षा व 65 किलो सायाबिन जप्त करण्यात आले आहे.
मळणीनंतर चंदू देसाई यांनी दोन पोत्यात भरून सोयाबिन शेतातच ठेवले होते. मंगळवारी सकाळी चंदू आपल्या शेतात गेले असता सोयाबिनची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सर्वत्र शोध सुरू केला. त्यावेळी हंदिगनूरजवळ ऑटोरिक्षातून दोन पोती घालून जाणारा कल्लाप्पा शिंदे त्यांना दिसला. ऑटोरिक्षातील पोती आपलीच असल्याची ओळख पटवून त्या शेतकऱयाने कल्लाप्पाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. काकती पोलिसांनी त्याला अटक केली.