दुधेभावी येथील घटना ः चाकूने भोसकले
प्रतिनिधी/कवठेमहांकाळ
शेतजमिनीच्या हद्दीच्या जुन्या वादातून भीषण मारामारी होऊन पाच जणांनी दोघांना चाकूने भोसकून गंभीर जखमी केले आहे. ही घटना दुधेभावी येथे बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जखमीचा मुलगा शंकर उर्फ विशाल दिनकर बंडगर याने तशी पोलिसात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी शंकर बंडगर व त्याचे साथीदार त्यांच्या शेतामध्ये खत टाकण्यासाठी बुधवारी सकाळी गेले होते मात्र शेतजमिनीच्या हद्दीच्या जुन्या वादातून आरोपी शिवाजी तातोबा बंडगर व बबन शिवाजी बंडगर यांनी फिर्यादीचे वडील दिनकर व त्यांची आई नकुसा यांना काठÎांनी मारहाण केली तर बायना बाई शिवाजी बंडगर, अंजली कुंडलिक बंडगर यांनी दिनकर व नकुसाच्या डोळ्यात चटणी टाकली आणि कुंडलिक उर्फ शुभम शिवाजी बंडगर याने दिनकरच्या पोटात चाकू मारून जखमी केले.
ही भीषण मारामारीच्या घटनेची वार्ता तालुकाभर पसरून खळबळ माजली होती. या मारामारीप्रकरणी शिवाजी बंडगर, कुंडलिक बंडगर, बबन बंडगर, बायना बंडगर आणि अंजली बंडगर यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डी वाय एस पी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक करे हे करीत आहेत.