शेतकरी संघर्ष समितीचे मंडणगड तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी/ मंडणगड
आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरिता शेनाळे गावाच्या हद्दीत होत असलेल्या जमीन अधिग्रहणासाठी दापोली प्रांताधिकाऱयांनी गुरूवारी येथील तहसील कार्यालयात सुनावणीचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्यामुळे सुनावणीसाठी कार्यालयाने सांगितलेल्या वेळेआधी मोठय़ासंख्येने आलेल्या शेतकऱयांनी महसूल प्रशासनाच्या वेळकाढू कार्यपध्दतीचा जाहीर निषेध करत शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने प्रांतांधिकाऱयांच्या नावे तहसीलदारांना निवेदन सादर केले.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 डी. डी. मार्गातील मौजे शेनाळे या गावाची 8 ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी कोविडमुळे रद्द करुन प्रशासनाच्या सोईनुसार 17 डिसेंबर तारीख देण्यात आली होती. त्यानुसार गावातील व परगावी मुंबई, पुणे येथे कामानिमीत्त राहणारे शेतकरी सुनावणीस हजर होते. मात्र तहसील कार्यालयात आल्यावर 16 डिसेंबर रोजी सायंकाळी प्रांताधिकाऱयांची प्रकृती अस्वस्थ्य झाल्याने ही सुनावणी रद्द झाल्याचे समजले. मात्र तहसील कार्यालयाकडून सुनावणी रद्द झाल्याची माहिती शेतकऱयांना वेळेवर देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱयांना नाहक प्रवास खर्च करुन सुनावणीसाठी हजेरी लावावी लागली. शेतकऱयांच्या बाबतीत प्रशासनाकडून बेपर्वाई व हलगर्जीपणा वारंवार होत आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी खेटे मारावे लागत असल्याने या शेतकऱयांकडून त्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला.
सुनावणीसंदर्भात तहसील कार्यालयाच्यावतीने गुरूवारी काढण्यात आलेल्या नोटीसमध्ये ही सुनावणी प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आली असून नव्या सुनावणीची पुढील तारीख दापोली उपविभागीय अधिकाऱयांकडून कळवण्यात येईल असे या शेतकऱयांना कळवण्यात आले आहे.
यापूर्वीसुध्दा प्रशासनाकडून दोनवेळा बैठक व सुनावणीच्या तारखा देऊन त्या अशाचप्रकारे आयत्यावेळी कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या सततच्या चालढकलीमुळे शेतकरी संतप्त झाले असून कोणत्याही क्षणी या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. सर्व शेतकरी हे जमिनीचे वहीवाटदार व कब्जेदार मुळ मालक आहेत. तरीसुध्दा प्रशासनाकडून त्यांच्य़ाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. या निवेदनावर रमेश घडवले, कौस्तुभ जोशी, अविनाश दळवी, शशिकांत लाड, विनोद दळवी यांच्यासह एकूण 53 ग्रामस्थांच्या सह्या आहेत.