मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे पार्थिव गुरुवारी एका खासगी विमानाने बँकॉकवरुन मायदेशी मेलबर्न शहरात आणण्यात आले. मागील आठवडय़ात वॉर्नचा धक्कादायक मृत्यू झाला होता.
ऑस्ट्रेलियन झेंडय़ात आच्छादित वॉर्नचे पार्थिव कॉफिनमधून रात्री 8.30 वाजता मेलबर्नमध्ये दाखल झाले. आणखी तीन आठवडय़ानंतर म्हणजे 30 मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर स्टेट फ्यूनरल होणार असून त्यावेळी किमान एक लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.
अव्वल दर्जाच्या लेगस्पिन गोलंदाजीच्या बळावर वॉर्नने आपल्या 15 वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीत 145 कसोटी सामन्यात 708 बळी घेतले. थायलंडमध्ये कोह समूई येथे दि. 4 मार्च रोजी तो निपचित अवस्थेत आढळून आला. नंतर त्याची प्राणज्योत त्यापूर्वीच मालवली असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून जाहीर केले गेले.