वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी महिलांच्या टी-20 ताज्या मानांकनात फलंदाजांच्या यादीत भारताची फलंदाज शेफाली वर्माने दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. आयसीसीतर्फे मंगळवारी ही ताजी मानांकन यादी जाहीर करण्यात आली.
महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी 748 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर असून भारताची शेफाली वर्मा 744 मानांकन गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. या यादीत भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने 693 मानांकन गुणांसह आपले सातवे स्थान राखले आहे. भारताची जेमिमा रॉड्रिग्ज 643 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडची सोफी डिव्हेनी तिसऱया, ऑस्ट्रेलियाची लेनिंग चौथ्या, ऑस्ट्रेलियाची ऍलिसा हिली पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या 10 फलंदाजांमध्ये भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे.
महिलांच्या टी-20 गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत इंग्लंडची इक्लेस्टोन 799 मानांकन गुणांसह पहिल्या, दक्षिण आफ्रिकेची शबनिम इस्माईल 764 मानांकन गुणांसह दुसऱया, इंग्लंडची सारा ग्लेन 755 गुणांसह तिसऱया, ऑस्ट्रेलियाची स्कूट 753 मानांकन गुणांसह चौथ्या, जेस जोनासेन 730 मानांकन गुणांसह पाचव्या, भारताची अष्टपैलू दीप्ती शर्मा सहाव्या तसेच भारताची राधा यादव आठव्या आणि पुनम यादव नवव्या स्थानावर आहे. अष्टपैलूच्या मानांकन यादीत भारताची दीप्ती शर्मा 302 मानांकन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातींल तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 20 मार्चपासून प्रारंभ होत आहे.