प्रतिनिधी / कोल्हापूर
शेतामध्ये माती पडल्याच्या कारणातून दांम्पत्यावर हल्ला करत शेतकऱ्याचा निर्घुण खून केल्याप्रकरणी दोघा सख्या भावांना तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. गुडधे यांनी आजन्म कारावायासाची शिक्षा सुनावली. साताप्पा पुंडलिक नरतवडेकर (वय 46), सुधीर लक्ष्मण बोटे (वय 29 दोघेही रा. हासुर बुद्रुक ता. कागल) अशी आरोपींची नावे आहेत. 14 एप्रिल 2017 रोजी हासूर बुद्रुक (ता. कागल) येथे ही घटना घडली होती. यामध्ये केरबा धोंडीबा बोटे (वय 55 रा. हासुर बुद्रुक ता. कागल) हे मृत झाले होते. तर फिर्यादी छाया केरबा बोटे (वय 49 रा. हासूर बुद्रुक ता. कागल) या जखमी झाल्या होत्या. सरकारी पक्षातर्फे ऍड. मंजुषा पाटील यांनी काम पाहिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, साताप्पा नरतवडेकर व मृत केरबा बोटे यांचे शेळप (ता. कागल) येथे एकमेकांना लागून शेत आहे. 14 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास केरबा बोटे व त्यांच्या पत्नी छाया त्यांच्या शेतामध्ये काम करत होत्या. याचवेळी साताप्पा व त्यांचा दत्तक भाउ सुधीर बोटे शेतातील माती ट्रक्टरच्या सहाय्याने सपाटीकरण करत होते. सपाटीकरणाचे काम सुरु असताना नरतवडेकर यांच्या शेतातील काही माती केरबा बोटे यांच्या बांधावर पडली. केरबा बोटे यांनी सुधीर बोटेस तुमच्या शेतातील माती काढून घ्या नाहीतर ती आम्ही आमच्या शेतात विस्कटून टाकू काय असे विचारले. यातून या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला.
या वादातून चिडून सुधीर बोटे याने केरबा व छाया यांना मातीचे ढेकळे व दगड मारण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे या दोघांनी शेतातून घराकडे पळ काढला. यानंतर काही वेळातच उत्तम बोटे यांच्या घराजवळ छाया व केरबा पोहोचले असता त्यांचा पाठलाग करत साताप्पा व सुधीर पोहोचले. या दोघांनी केरबा यांना धक्का देवून खाली पाडत हल्ला केला. केरबा यांच्या डोक्यात काठीचा वर्मी घाव बसल्याने केरबा गंभीर जखमी झाले. या घटनेची तक्रार मुरगूड पोलीस ठाण्यात दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी या घटनेचा तपास करुन साताप्पा नरतवडेकर, सुधीर बोटे या दोघांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. गुडधे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी छाया, सुशिला बोटे, विठ्ठल साळोखे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवानंद कुंभार, डॉ. राहुल देसाई, डॉ. हर्षल शिखरे यांच्या साक्षी ग्राह्य मानल्या तसेच सरकारी वकील ऍड मंजुषा पाटील यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून. न्यायालयाने दोघांनाही आजन्म कारावास, एक वर्ष सक्त मजुरी तसेच प्रत्येक 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी मारुती नाईक, पोलीस हवालदार संजय पाटील, संतोष पाटील यांनी यांची या खटल्यामध्ये मोलाची मदत झाली.