मच्छीमारांच्या चेहऱयावर हसू उमलले
मालवण:
वाऱयाची दिशा बदलल्याने शनिवारी दांडी येथील रापण व्यावसायिकांच्या जाळय़ात शनिवारी विविध प्रकारची मासळी सापडून आली. पारंपरिक मच्छीमारांना अपेक्षित असलेला ऊपरचा म्हणजे काहीसा उत्तरेकडून वाहणारा वारा शुक्रवारपासून पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे गेले महिनाभर मासळीच्या प्रतीक्षेत असलेल्या रापण व्यावसायिकांच्या चेहऱयावर शनिवारी हसू उमलले. रापणींना मोठय़ा प्रमाणात ‘खवळा’ मासे मिळाले. किनाऱयावर खवळय़ांचा खच घालत त्यामधून कोळंबीसह पापलेट, बांगडे, धोडीया, सनाकी आदी चविष्ट मासे वेचण्यासाठी मच्छीमारांनी किनाऱयावरच बैठक मांडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
24 ऑगस्टच्या दरम्यान इंडोनेशियानजीक समुद्रात झालेल्या भूकंपामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्याचा परिणाम अरबी समुद्रात जाणवला होता. उत्तरेकडून वाहणाऱया वाऱयांची दिशा बदलून वारा दक्षिणकेडून म्हणजेच मच्छीमारांच्या बोलीत ‘हय़ेट’च्या बाजूने वाहू लागला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी किनाऱयालगत दिसणारी विविध प्रकारची मासळी खोल समुद्रात सरकली होती. मात्र शुक्रवारपासून पुन्हा एकदा ऊपरचे वारे वाहू लागले आहेत. समुद्राच्या पाण्याचा थंडपणाही वाढला आहे. मच्छीमारांच्या शब्दात सांगायचे तर समुद्राच्या पाण्याला पुन्हा ‘शेळ’ लागलीय. त्यामुळे मासळी किनाऱयाकडे सरकली आहे. दांडी समुद्रकिनारी शनिवारी लावण्यात आलेल्या रापणींना विविध प्रकारची मासळी सापडली. एकामागोमाग रापणी लावल्या जात होत्या. प्रामुख्याने खवळा मासेच मोठय़ा प्रमाणात सापडून आले. प्रती जाळी 625 रुपये एवढा भाव खवळय़ाला मिळाला.
पारंपरिक मच्छीमारांची दानत मोठी
पारंपरिक मच्छीमारांना जेव्हा बऱयापैकी मासे मिळतात, तेव्हा तो प्रचंड खूष असतो. दर्याराजाने त्याला चांगली बरकत दिली की, इतरांना दोन्ही हाताने देण्याची त्याची दानतही मोठी असते. याच गोष्टीचा प्रत्यय शनिवारी आला. रापणीच्या मासळीसाठी आलेल्या मत्स्य खवय्यांकडून कोणताही मोबदला न घेता ते मुक्त हस्ते त्यांना कोळंबी, पापलेट, बांगडे आदी मासे देत होते.