वृत्तसंस्था/ दुबई
आयपीएलमधील शेवटच्या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडय़ांनी दणदणीत पराभव करून साखळी फेरीची विजयी सांगता केली. दिल्ली कॅपिटल्सला 5 बाद 164 धावांवर रोखल्यानंतर आरसीबीने 3 बाद 166 धावा जमवित रोमांचक विजय साकारला.
शेवटच्या षटकात आरसीबीला 15 धावांची गरज असताना पहिल्या पाच चेंडूत मॅक्सवेल व केएस भरत यांनी 10 धावा काढल्या. शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना केएस भरतने अवेश खानला षटकार खेचत रोमांचक विजय साकार केला. मॅक्सवेलने 33 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 51 तर भरतने 52 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 78 धावा फटकावल्या. या दोघांनी 111 धावांची अभेद्य भागीदारी नोंदवली. याशिवाय एबी डिव्हिलियर्सने 26 चेंडूत 26 धावा जमविल्या. दिल्लीच्या ऍन्रिच नॉर्त्झेने 2, अक्षर पटेलने एक गडी बाद केला. सामना गमविला असला तरी दिल्लीचे आघाडीचे स्थान कायम असून आरसीबीनेही 18 गुणांसह तिसरे स्थान राखले आहे.
दिल्लीचा जलद प्रारंभ
तत्पूर्वी, पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी केलेल्या 88 धावांच्या सलामीचा पदकतक्त्यात आघाडीवर असणाऱया दिल्ली कॅपिटल्सच्या नंतरच्या फलंदाजांना उपयोग करून घेता आला नाही. शिमरॉन हेतमेयरने दोन उत्तुंग षटकार व दोन चौकार मारत संघाला दीडशेचा टप्पा पार करून दिला. आरसीबीच्या मोहम्मद सिराजने किफायतशीर मारा करीत 25 धावांत 2 बळी मिळविले तर हर्षल पटेल, यजुवेंद्र चहल, डॅन ख्रिस्तियन यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर धवन व शॉ यांनी दिल्लीला वेगवान सुरुवात करून देताना पॉवरप्लेच्या 6 षटकांत फारसे धोके न पत्करता 55 धावा फटकावल्या. फॉर्ममध्ये असलेल्या धवनने येथेही सफाईदार खेळ केला तर शॉनेही काही शानदार फटके लगावले. आरसीबी कर्णधार कोहलीने ग्लेन मॅक्सवेलच्या ऑफस्पिनने गोलंदाजीला सुरुवात केली. त्याने पहिलाच चेंडू वाईड टाकला. धवनने ऑफड्राईव्हचा चौका लगावत धावांचा ओघ सुरू केला आणि या डाव्या-उजव्या जोडीने 10 षटकांतच 88 धावा फटकावल्या. हर्षल पटेलने ही जोडी फोडताना धवनला डॅन ख्रिस्तियनकरवी झेलबाद केले. धवनने 35 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 43 धावा फटकावल्या. धोकादायक ठरत असलेल्या शॉने चहलला स्वीपचा षटकार मारल्यानंतर अर्धशतकासमीप आला असताना पुन्हा त्याला षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि डीपमध्ये गॅरटॉनने त्याचा झेल टिपला. शॉने 31 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने 48 धावा झोडपल्या. ख्रिस्तियनने नंतर कर्णधार रिषभ पंतला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद करीत दिल्लीला आणखी एक धक्का दिला. यावेळी दिल्लीने 13 षटकांत 3 बाद 108 धावा जमविल्या होत्या.
18 व्या षटकात सिराजनने श्रेयस अय्यरला 18 धावांवर बाद केल्यानंतर हेतमेयरने फटकेबाजी करीत 22 चेंडूत 2 षटकार, 2 चौकारांसह 29 धावा फटकावल्या. तो डावातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला. रिपाल पटेल 7 धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक ः दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 5 बाद 164 ः पृथ्वी शॉ 48 (31 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), धवन 43 (35 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), रिषभ पंत 10 (8 चेंडूत 1 चौकार), श्रेयस अय्यर 18 (18 चेंडूत 1 चौकार), हेतमेयर 29 (22 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), रिपाल पटेल 7, अवांतर 9. गोलंदाजी ः सिराज 2-25, चहल 1-34, हर्षल पटेल 1-34, ख्रिस्तियन 1-19. आरसीबी 20 षटकांत 3 बाद 166 ः कोहली 8 चेंडूत 4, पडिक्कल 0, श्रीकर भरत नाबाद 78 (52 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), डीव्हिलियर्स 26 (26 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), मॅक्सवेल नाबाद 51 (33 चेंडूत 8 चौकार), अवांतर 7. गोलंदाजी ः नॉर्त्झे 2-24, अक्षर पटेल 1-39, अवेश खान 0-31, रबाडा 0-37, रिपाल पटेल 0-22.