मालिकेत यजमानांची विजयी आघाडी, बेथ मुनीचे नाबाद शतक, मॅकग्राची अष्टपैलू चमक, स्मृतचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ मॅके
अतिशय रोमांचक ठरलेल्या दुसऱया वनडे डे-नाईट सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियन महिलांनी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवित भारताविरुद्धच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. तसेच विजयाची मालिका कायम राखत त्यांनी सलग 25 वा विजय नोंदवला. बेथ मुनीचे नाबाद शतक, मॅकग्राची अष्टपैलू कामगिरी ऑस्ट्रेलियन विजयात निर्णायक ठरली. भारताच्या स्मृती मानधनाचे अर्धशतक मात्र वाया गेले.
ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज होती. झुलन गोस्वामीने टाकलेल्या या षटकातील पहिल्या चेंडूवर बेथ मुनीने 3 धावा घेतल्यानंतर निकोला कॅरेने दुसऱया चेंडूवर 2 धावा काढल्या. झुलनने तिसरा चेंडू बीमर टाकल्याने पंचांनी त्याला नोबॉल ठरविले. त्यानंतर तिसऱया अधिकृत चेंडूवर दोघींनी बाय घेतल्यानंतर चौथ्या चेंडूवर लेगबायची धाव मिळाली. यावेळी 2 चेंडूत 5 असे समीकरण होते. कॅरेने पाचव्या चेंडूवर 2 धावा घेतल्या आणि पुढच्या फुलटॉस चेंडूवर कॅरेने मारलेला फटका मिडविकेटवरील क्षेत्ररक्षकाच्या हातात गेल्यानंतर भारतीयांनी जल्लोष सुरू केला. पण पंचांनी चेंडूची उंची जाणून घेण्यासाठी तिसऱया पंचांची मदत घेतली. त्यांनी अनेकदा रिप्ले पाहून शेवटी हा नोबॉल असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर कॅरेने 2 धावा घेत विजयावर शिक्कामोर्तब केला.
त्याआधी स्मृती मानधनाच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने 50 षटकात 7 बाद 274 धावा जमवित ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 275 धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 5 बाद 275 धावा जमवित रोमांचक विजय मिळविला. बेथ मुनीने अखेरपर्यंत नाबाद राहत 133 चेंडूत 13 चौकारांसह 125 धावा जमविल्या तर कॅरेने 38 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीत 3 बळी टिपणाऱया ताहलिया मॅकग्राने फलंदाजीत 77 चेंडूत 74 धावांचे योगदान देत अष्टपैलू चमक दाखविली. या सामन्यातील एकमेव षटकार भारताच्या रिचा घोषने नोंदवला.
स्मृतीचे अर्धशतक
या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने एकतर्फी जिंकून आघाडी मिळविली होनी. या दुसऱया सामन्यात भारताच्या फलंदाजांनी सुधारित कामगिरी केली. सलामीच्या स्मृती मानधनाने वनडे क्रिकेटमधील आपले 19 वे अर्धशतक झळकवताना 11 चौकारांसह 86 धावा जमविल्या. स्मृतीने रिचा घोषसमवेत 74 धावांची भागिदारी केली. त्यामध्ये घोषचा वाटा 44 धावांचा होता. त्याचप्रमाणे शफाली वर्मासमवेत स्मृतीने 74 धावांची भर घातली. वर्माने 22 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. 2018 पासून ऑस्ट्रेलियन महिला संघाने सलग 24 सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. शुक्रवारच्या सामन्यात पहिल्या दहा षटकात भारताने 68 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाची फिरकी गोलंदाज मोलिनने 12 व्या षटकात घोषला बाद केले. कर्णधार मिताली राज चोरटी धाव घेण्याच्या नादात 8 धावांवर धावचीत झाली. भाटियाने केवळ 3 धावा जमविल्या. पूजा वस्त्रकारने 29 तसेच झुलन गोस्वामीने नाबाद 28 धावा जमविताना या जोडीने 53 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियातर्फे मॅकग्राने 45 धावांत 3 तर मोलिनने 28 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला 50 षटकात 7 बाद 274 ः स्मृती मानधना 86, घोष 44, शफाली वर्मा 22, वस्त्रकार 29, गोस्वामी 25 चेंडूत नाबाद 28, दीप्ती शर्मा 23, अवांतर 31 (5 बाय, 9 लेगबाय, 17 वाईड), मॅकग्रा 3-45, मोलिन 2-28, ब्राऊन 1-63). ऑस्ट्रेलियन महिला 50 षटकांत 5 बाद 275 ः बेथ मुनी नाबाद 125, मॅकग्रा 74, कॅरे नाबाद 39, ऍश्ले गार्डनर 12, अवांतर 17, गोस्वामी 1-40, मेघना सिंग 1-38, पूजा वस्त्रकार 1-43, दीप्ती शर्मा 1-60, गायकवाड 0-49, पूनम यादव 0-38).