हरियाणावर सनसनाटी विजय मिळवित बडोदा उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
विष्णू सोळंकीने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत बडोदाला हरियाणावर 8 गडय़ांनी सनसनाटी विजय मिळवून देत सईद मुश्ताक अली करंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून दिली. सोळंकीने नाबाद 71 धावा फटकावल्या.
तिसऱया उपांत्यपूर्व सामन्यात बडोदाने हरियाणाला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 148 धावांवर रोखल्यानंतर सोळंकीने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलताना 46 चेंडूत 4 चौकार, 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 71 धावा झोडपल्या. त्यांना 12 चेंडूत 23 धावांची गरज असताना हरियाणाचा कर्णधार मोहित शर्माने 19 व्या षटकात केवळ 5 धावा दिल्याने शेवटच्या षटकांत विजयासाठी 18 धावा करण्याचे थोडेसे कठीण आव्हान मिळाले होते. पण 28 वर्षीय सोळंकीने मध्यमगती गोलंदाज सुमित कुमारने टाकलेल्या शेवटच्या षटकात एक चौकार, 2 षटकार ठोकत बडोदाला आठ गडय़ांनी विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना त्याने हेलिकॉप्टर शॉटचा षटकार ठोकून सामना संपविला. त्याआधी सोळंकीने केदार देवधरसमवेत दुसऱया गडय़ासाठी 68 धावा जोडल्या होत्या. केदारने 40 चेंडूत 43 धावा फटकावल्या.
त्याआधी हरियाणाच्या डावात 2 बाद 25 अशा स्थितीनंतर हिमांशू राणा (40 चेंडूत 49) व शिवम चौहान (29 चेंडूत 35) यांनी तिसऱया गडय़ासाठी 80 धावांची भागीदारी करून डाव सावरला होता. चौहानने आपल्या खेळीत 3 चौकार, 1 षटकार मारला तर राणाने 7 चौकार मारले. 15 व्या षटकांत अतित शेठने चौहानला बाद करून ही जोडी फोडली आणि पुढच्याच षटकात राणाही बाद झाल्यानंतर 4 बाद 115 अशी हरियाणाची स्थिती झाली. सुमितने 16 चेंडूत नाबाद 20 धावा फटकावल्या तरी बडोदाच्या गोलंदाजांनी त्यांना 150 धावांच्या आत रोखण्यात यश मिळविले. बडोदासाठी कार्तिक काकडेने 7 धावांत 2 बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक ः हरियाण 20 षटकांत 7 बाद 148 (हिमांशू राणा 49, शिवम चौहान 35, कार्तिक काकडे 2-7, अतित शेठ 1-27), पराभूत वि. बडोदा 20 षटकांत 2 बाद 150 (विष्णू सोळंकी नाबाद 71, केदार देवधर 43, यजुवेंद्र चहल 1-15).