सेन्सेक्सची 25.16 अंकांची घसरण : बँकेचे समभाग घसरले
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील शेअर बाजाराची वाटचाल दबावात झाली असून यात केंद्राने 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केल्यानंतर एक दिवस बाजारात तेजीची उसळी दिसली होती. परंतु ही आर्थिक घोषणा शेअर बाजाराला पसंत पडली नसल्यामुळे सलग दुसऱया दिवशी सेन्सेक्समध्ये हलकीशी घसरण झाली आहे.
आर्थिक मदतीचा हात सरकारने पुढे केला असला तरी तात्काळ व प्रत्यक्ष मागणीतील वृद्धी कायम राहण्याचे संकेत कमी असल्यामुळे भविष्यातील आर्थिक तरतूदीबाबत शंका असल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे. दिवसभरातील व्यवहारा दरम्यान सेन्सेक्स 350 पेक्षा अधिक अंकांनी घसरला होता. दिवसअखेर सेन्सेक्स 25.16 अंकांनी घसरुन निर्देशांक 31,097.73 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 5.90 अंकांनी घसरुन निर्देशांक 9,136.85 वर बंद झाला.
दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्समध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग 4 टक्क्मयापेक्षा अधिक घसरले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँक, हिरो मोटो कॉर्प, सन फार्मा आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागांनी घसरण नोंदवली आहे. आर्थिक पॅकेजअंतर्गत देण्यात येणाऱया निधीबाबत स्पष्टता नसल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या कोविड 19च्या आकडेवारीमुळे देशात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 81,970 च्या घरात पोहोचली आहे. परिणामी उद्योग क्षेत्रातील उलाढाल पुन्हा सुरळीत होण्यास विलंब होणार असल्याच्या काळजीने शेअर बाजारात गुंतवणूकदार दबावामध्ये आहेत. आगामी काळात बाजाराचा कल कोणत्या बाजूला राहणार हे निश्चित करणे कठीण असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.