वृत्तसंस्था /लंडन
ब्रिटनचा चार वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन मो फराहला टोकियो ऑलिम्पिक पात्रतेच्या शेवटच्या प्रयत्नातही अपयश आले असून यामुळे त्याला आपल्या देदीप्यमान कारकिर्दीची ऑलिम्पिकमध्ये सांगता करता येणार नाही, हे स्पष्ट झाले. मँचेस्टरमध्ये शेवटच्या पात्रता स्पर्धेत मो फराह 10 हजार मीटर्स इव्हेंट जिंकण्यात यशस्वी ठरला असला तरी तो ऑलिम्पिक क्वॉलिफाईंग मार्क गाठू शकला नाही. आश्चर्य म्हणजे फराहला ऑलिम्पिक पात्रता सिद्ध करता यावी, यासाठीच ही ब्रिटीश चॅम्पियनशिप आयोजित केली गेली होती.
38 वर्षीय फराहने 27 मिनिटे 47 सेकंद वेळेत 10 हजार मीटर्सचा हा इव्हेंट पूर्ण करत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. मात्र, ऑलिम्पिक क्वॉलिफाईंग मार्कपासून तो 20 सेकंदांनी दूर राहिला. फराहने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये 5 हजार व 10 हजार मीटर्सचे दुहेरी सुवर्ण जिंकले व 2016 रिओ ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदकाची पुनरावृत्ती केली. मात्र, यंदा तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिसणार नाही, हे या निकालाने स्पष्ट झाले. फराहला अलीकडे गुडघ्याच्या दुखापतीचा सातत्याने त्रास जाणवत असून याचा त्याच्या फॉर्मवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. 5 जून रोजी संपन्न झालेल्या 10 हजार मीटर्स इव्हेंटमध्ये तो चक्क आठव्या स्थानी फेकला गेला होता.