क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला बदली स्ट्रायकर डेव्हीड विलियम्सने नोंदविलेल्या गोलामुळे एटीके मोहन बागानने चेन्नईन एफसीला पराभूत केले. आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील हा सामना फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आला.
या विजयाने एटीके मोहन बागान संघाला तीन गुण प्राप्त झाले. एटीकेचे आता 12 सामन्यांतून सात विजय, तीन बरोबरी आणि दोन पराभवाने 24 गुण झाले असून त्यांनी त्यांचे गुणतक्त्यातील दुसरे स्थान अबाधित राखले आहे. चेन्नईन एफसीसाठी या स्पर्धेतील हा चौथा पराभव. 13 सामन्यांतून त्यांचे आता तीन विजय, सहा बरोबरी आणि पाच पराभवाने त्यांचे 15 गुण कायम राहिले आणि ते आता सहाव्या स्थानावर आहेत.
चेन्नईनचा गोलरक्षक विशाल कैथने केलेल्या अभेद्य गोलरक्षणामुळे एटीके मोहन संघाची गोलसंख्या केवळ एकपुरती मर्यादीत राहिली. विशालने काल एटीकेचे होणाऱया किमान दोन गोल अप्रतिम गोलरक्षण करून अडविले. पहिल्या सत्रातील पहिल्याच मिनिटाला एटीकेच्या टिरीने 35 यार्डवरून मारलेला शक्तिशाली फटका चेन्नईन एफसीचा गोलरक्षक विशाल कैथने अडविला.
त्यानंतर कार्ल मॅकहय़ुज आणि इस्माईल गोन्साल्वीसच्या रचलेल्या चालीवर रहीम अलीने फटका बाहेर मारल्याने एटीके मोहन बागानची परत एकदा संधी वाया गेली. 21 व्या मिनिटाला परत एकदा विशाल कैथच्या गोलरक्षणामुळे एटीके गोल करण्यात असफल ठरला. यावेळी टिरी आणि एदू गार्सियाच्या चालीवर झेवियर हर्नांडिझचा गोलमध्ये जाणारा फटका विशालने आपल्या डाव्या बाजूने झेपावत अडविला.
दुसऱया सत्रातही एटीके मोहन बागान संघाने चेन्नईनवर वर्चस्व राखले. प्रथम आरंभाला परत एकदा गोलरक्षक विशालने एटीकेच्या झेवियर हर्नांडिझची फ्रिकीक डाईव्ह मारून अडविली. सामना बरोबरीत राहणार असे वाटत असताना एटीके मोहन बागानने विजयी गोलाची नोंद केली. झेवियर हर्नांडिसच्या कॉर्नरवर बदली खेळाडू डेव्हीड विलियम्सने हेडरवर यावेळी मात्र विशाल कैथला भेदले आणि चेंडू जाळीत टोलविला. या गोलनंतर चेन्नईनच्या जाकूब सिल्वेस्टरचा हेडर गोलमध्ये जात असताना गोलरेषेवरून एटीकेचा बचावपटू टिरीने बाहेर टाकला. या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार एटीकेला तीन गुण प्राप्त करून दिलेल्या डेव्हीड विलियम्सला मिळाला.