हॉस्पिटलमध्ये आणखी एक दिवस मुक्काम, व्यायामास सुरुवात
वृत्तसंस्था/ मनामा
रविवारी झालेल्या बहरिन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत अपघात झाल्यानंतर हास गाडीने पेट घेतल्याने जखमी झालेला रोमेन ग्रोस्जेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्याला आणखी एक दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागणार आहे. मात्र अबु धाबीमध्ये होणाऱया मोसमातील व कारकिर्दीतील शेवटच्या शर्यतीत भाग घेण्यास तो उत्सुक झाला असल्याचे हासचे बॉस गुंथेर स्टीनर यांनी सांगितले.
34 वर्षीय ग्रोस्जेनच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर त्याच्या गाडीने पेट घेतला होता आणि आगीच्या लोळातून सुरक्षा रक्षकाच्या मदतीने तो बाहेर पडला होता. विशेष म्हणजे इतका भीषण अपघात होऊनही त्याच्या शरीरातील कुठल्याही हाडाला फ्रॅक्चर झाले नाही. हाताच्या बोटांना व घोटय़ाला आगीची झळ बसल्याने किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्याला मंगळवारी डिस्चार्ज दिले जाणार होते. ‘त्याच्याकडून उपचाराला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर्सही अपेक्षेप्रमाणे सुधारणा होत असल्याचे पाहून खुश झाले आहेत, असे रोमेननेच मला सांगितले. त्यामुळे तो पूर्णपणे ठीक असून त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही,’ असे हासचे प्रमुख स्टीनर यांनी सांगितले. ‘जखम लवकर भरून येण्यासाठी आणखी एक दिवस हॉस्पिटलमध्ये राहणे जरूरीचे आहे,’ असे ग्रोस्जेननेही स्पष्ट केले.
ग्रोस्जेन पुढील मोसमात फॉर्म्युला वनमधून बाहेर पडणार असून हासमध्ये त्याच्या जागी ब्राझीलचा राखीव ड्रायव्हर पीएट्रो फिटिपल्डी, या आठवडय़ाच्या अखेरीस बहरिनमध्येच होणाऱया दुसऱया ग्रां प्रि शर्यतीत भाग घेणार आहे. 13 डिसेंबरला या मोसमातील शेवटची ग्रां प्रि शर्यत अबु धाबीत होणार असून त्यात भाग घेता यावे यासाठी ग्रोस्जेन पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हात व डाव्या पायाला बँडेज बांधलेल्या अवस्थेत व्यायाम करतानाचे फोटोही त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पुढील मोसमात हासने दोन ड्रायव्हर्स निश्चित केले असून रशियाचा निकिता मेझपिन हा त्यापैकी एक असल्याचे मंगळवारी त्यांनी जाहीर केले.
वर्ल्ड चॅम्पियन हॅमिल्टनला कोरोनाची लागण
या वर्षीची वर्ल्ड चॅम्पियनशिप व बहरिनमधील ग्रां प्रि शर्यत जिंकणाऱया मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनला कोरोनाची लागण झाली असल्याचे त्याच्या संघाने सांगितले. त्यामुळे या आठवडय़ाच्या अखेरीस बहरिनमध्येच होणारी दुसरी ग्रां प्रि शर्यत त्याला हुकणार आहे.
गेल्या आठवडय़ात हॅमिल्टनची तीनदा कोरोना चाचणी घेण्यात आली आणि तिन्ही वेळा ती निगेटिव्ह आली होती. त्यातील शेवटची चाचणी रविवारी दुपारी घेण्यात आली होती. पण सोमवारी सकाळी त्याला कोरोनाची हलकी लक्षणे आढळून आल्यानंतर त्याने लगेचच त्याची माहिती दिली. याशिवाय बहरिनमध्ये दाखल होण्याआधी त्याचा एकाशी संपर्क आला होता, तो पॉझिटिव्ह आल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे लेविसने आपली चाचणीही करवून घेतली आणि त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्याची पुन्हा एकदा घेतलेल्या चाचणीत त्याला दुजोरा मिळाला. बहरिनमधील कोरोना नियमावलीनुसार लेविस आता आयसोलेशनमध्ये राहत आहे. हलकी लक्षणे सोडल्यास तो पूर्ण फिट व तंदुरुस्त आहे,’ असे मर्सिडीजने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.