मात्र भारत युवा संघाचा मालिका विजय
वृत्तसंस्था/ ईस्ट लंडन
कर्णधार प्रियम गर्गने अर्धशतक नोंदवल्यानंतरही भारताच्या 19 वर्षांखालील युवा संघाला दक्षिण आफ्रिका युवा संघाकडून शेवटच्या वनडे सामन्यात 5 गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र भारताने तीन सामन्यांची ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या सामन्यात नाबाद 88 धावा जमविणाऱया द.आफ्रिकेचा युवा फलंदाज जोनाथन बर्डला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
पहिले दोन सामने जिंकून भारत युवा संघाने याआधीच मालिका जिंकली होती. त्यामुळे हा सामना बिनमहत्त्वाचा होता. सोमवारी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारत युवा संघाची खराब सुरुवात झाली आणि धावफलकावर अर्धशतक लागण्यापूर्वीच तीन फलंदाज तंबूत परतले होते. अचिले क्लोएटने यापैकी दोन बळी मिळविले. प्रियम गर्ग व एन. तिलक वर्मा (25) यांनी चौथ्या गडय़ासाठी 58 धावांची अर्धशतकी भागीदारी करून डाव थोडाफार सावरला होता. भारताचे शतक फलकावर लागल्यावर गर्ग बाद झाल्याने ही जोडी फुटली. गर्गने 76 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 52 धावा जमविल्या. 100 धावसंख्येवर भारताचा चौथा फलंदाज बाद झाला होता.
आणखी 18 धावांची भर पडल्यानंतर वर्माही बाद झाला. वर्माने 44 चेंडूंच्या खेळीत केवळ 1 चौकार मारला. यानंतर ठरावीक अंतराने भारताचे गडी बाद होत राहिले आणि 50 षटकांत 8 बाद 192 धावांपर्यंतच मजल मारता आली. दक्षिण आफ्रिका युवा संघातर्फे फेकू मॉलेत्सेनने 2 गडी बाद केले आणि दोघांना धावचीत करण्यातही साहाय्य केले. अष्टपैलू यशस्वी जयस्वाल यावेळी 23 चेंडूत 16 धावांत जमवू शकला तर कुमार कुशाग्रने 6, दिव्यांश सक्सेनाने 4 धावा जमविल्या. याशिवाय धुव जुरेलने 22, शाश्वत रावतने 10, रक्षणने नाबाद 17, विद्याधर पाटीलने 15, एस. मिश्राने नाबाद 14 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिका युवा संघाने 10 चेंडू बाकी असताना विजयाचे उद्दिष्ट गाठताना 5 बाद 193 धावा जमविल्या. जोनाथन बर्ड हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने 121 चेंडूत 9 चौकार, एका षटकाराच्या मदतीने नाबाद 88 धावा जमविल्या. द.आफ्रिकेने नवव्या षटकात ब्राईस पार्सन्सला (15) पहिल्या गडय़ाच्या रूपात गमविले. अँड्रय़ू लू समवेत त्याने 35 धावांची सलामी दिली. त्यानंतर लू व बर्ड यांनी 49 धावांची भर घातली. लू व लेव्हर्ट मान्ज (0) एका धावेच्या फरकाने बाद झाले. लू ने 77 चेंडूत 2 चौकार, एक षटकारासह 31 धावा जमविल्या. ल्युक ब्युफोर्टने (14) बर्डला चांगली साथ दिल्याने 48 धावांची भागीदारी करून संघाला 130 धावांपर्यंत नेले.
जॅक लीस (29) व बर्ड यांनी नंतर 67 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठय़ावर आणले असताना जयस्वालने 48 व्या षटकात लीसला बाद केले. लीसने 44 चेंडूंच्या खेळीत 3 चौकार मारले. बर्डने नंतर विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. भारतातर्फे जयस्वालने 2 तर आकाश सिंग, रक्षण, दिव्यांश सक्सेना यांनी प्रत्येकी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावलफक : भारत यू-19 संघ 50 षटकांत 8 बाद 192 : यशस्वी जयस्वाल 16, कुशाग्र 6, दिव्यांश सक्सेना 4, प्रियम गर्ग 52 (76 चेंडूत 6 चौकार), तिलक वर्मा 25 (44 चेंडूत 1 चौकार), ध्रुव जुरेल 22 (50 चेंडूत 1 चौकार), शाश्वत रावत 10, रक्षण नाबाद 17 (37 चेंडूत 2 चौकार), विद्याधर पाटील 15 (19 चेंडूत 2 चौकार), एस. मिश्रा नाबाद 14 (15 चेंडूत 2 चौकार), अवांतर 11. गोलंदाजी : क्लोएट 2-46, मॉलेत्सेन 2-36, टी.व्हान व्हुरेन 1-21, मोडमोकोएन 1-28.
दक्षिण आफ्रिया यू-19 संघ 48.2 षटकांत 5 बाद 193 : अँड्रय़ू लू 31 (77 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), पार्सन्स 15 (26 चेंडूत 2 चौकार), बर्ड नाबाद 88 (121 चेंडूत 9 चौकार, 1 षटकार), मान्ज 0, ब्युफोर्ट 14, लीस 29 (44 चेंडूत 3 चौकार), व्हुरेन नाबाद 3, अवांतर 13. गोलंदाजी : जयस्वाल 2-41, आकाश सिंग 1-23, रक्षण 1-29, सक्सेना 1-18.