शेवटच्या चेंडूवर षटकार खेचण्यात डीव्हिलियर्सला अपयश, हैदराबादचा 4 धावांनी निसटता विजय
अबु धाबी / वृत्तसंस्था
सामनावीर केन विल्यम्सन (31) व जेसॉन रॉय (44) यांची फटकेबाजी व गोलंदाजांच्या चतुरस्त्र माऱयाच्या बळावर हैदराबाद सनरायजर्सने आयपीएल साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला 4 धावांनी पराभवाचा जबरदस्त झटका दिला. हैदराबादने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 20 षटकात 7 बाद 141 धावा केल्या तर प्रत्युत्तरात आरसीबीला 20 षटकात 6 बाद 137 धावांवर समाधान मानावे लागले.
शेवटच्या षटकात 13 धावांची गरज असताना आरसीबीचा डीव्हिलियर्स क्रीझवर होता. मात्र, शेवटचे 4 चेंडू खेळण्याची संधी मिळाल्यानंतरही तो संघासाठी विजय संपादन करुन देऊ शकला नाही.
विजयासाठी 142 धावांचा पाठलाग करताना आरसीबीतर्फे देवदत्त पडिक्कल (41) व ग्लेन मॅक्सवेल (40) यांनी जोरदार फटकेबाजी केली. पण, अगदी मोक्याच्या क्षणी विराटच्या नेतृत्वाखालील हा संघ अपयशी ठरला. गोलंदाजीत, भुवनेश्वर, होल्डर, सिद्धार्थ कौल, मलिक व रशिद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
रॉय-विल्यम्सनची फटकेबाजी
तत्पूर्वी, सलामीवीर जेसॉन रॉयने 38 चेंडूत 44 धावांचे योगदान दिल्यानंतरही हैदराबादला 7 बाद 141 या माफक धावसंख्येवर समाधान मानावे लागले. रॉयने कर्णधार केन विल्यम्सनसमवेत 58 चेंडूत 70 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. केन विल्यम्सनने 29 चेंडूत 4 चौकारांसह 31 धावांचे योगदान दिले. मात्र, हैदराबादने 7 चेंडूत 2 धावांमध्ये 3 फलंदाज गमावले आणि यामुळे त्यांचे मोठी धावसंख्या रचण्याचे मनसुबे धुळीस मिळाले.
शेख झाएद स्टेडियमवरील या लढतीत आरसीबीचा जलद गोलंदाज हर्षल पटेलने सर्वात किफायतशीर गोलंदाजी साकारताना 33 धावात 3 बळी घेतले. कर्णधार विराट कोहलीने या लढतीत नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते.
डॅनिएल ख्रिस्तियनने (2-14) दुहेरी यश संपादन केले तर यजुवेंद्र चहल (1-27), शाहबाज अहमद (0-27) यांनी नियंत्रित मारा केला. जॉर्ज गॅरटॉनला 2 षटकात 29 धावात 1 बळी घेता आला. सलामीला बढती देण्यात आलेल्या अभिषेक शर्माने (10 चेंडूत 13) गॅरटॉनच्या दुसऱया षटकात 1 चौकार व 1 षटकार वसूल केला. नंतर ग्लेन मॅक्सवेलकडे झेल देत तो बाद झाला. विल्यम्सनने लक्षवेधी कव्हर ड्राईव्हवर चौकार वसूल करत उत्तम सुरुवात केली. शिवाय, सिराजला (0-17) स्क्वेअरलेगच्या दिशेने पुन्हा एकदा फटकावून दिले. न्यूझीलंडच्या या कर्णधाराने उत्तम तंत्राचा दाखला देत चौफेर फटकेबाजीवर भर दिला.
पॉवर प्ले षटकाअखेर हैदराबादने 1 बाद 50 पर्यंत मजल मारली होती. शाहबाज व यजुवेंद्र या फिरकीपटूंनी त्यानंतर हैदराबादच्या फलंदाजांना बऱयापैकी जखडून ठेवले. विल्यम्सनला हर्षल पटेलने कटरवर त्रिफळाचीत केले तर प्रियम गर्गने चहलला षटकार खेचल्यानंतर ख्रिस्तियनच्या पुढील षटकातच डीव्हिलियर्सकडे सोपा झेल दिला. 5 चेंडूंच्या अंतराने ख्रिस्तियनने स्वतःच्या गोलंदाजीवरच परतीचा उत्तम झेल टिपत सेट झालेल्या जेसॉन रॉयची खेळी संपुष्टात आणली.
चहलने नंतर अब्दुल समदला (1) पायचीत केले. यामुळे, हैदराबादची 15.1 षटकात 5 बाद 107 अशी स्थिती झाली. साहाला (10) पटेलने स्लोअर वनवर चकवले तर रशिद खान (9 चेंडूत नाबाद 7) व होल्डर (13 चेंडूत 16) यांनी धावगती उंचावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यापैकी जेसॉन होल्डर डावातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला.
धावफलक
सनरायजर्स हैदराबाद ः जेसॉन रॉय झे. व गो. ख्रिस्तियन 44 (38 चेंडूत 5 चौकार), अभिषेक शर्मा झे. मॅक्सवेल, गो. गॅरटॉन 13 (10 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), केन विल्यम्सन त्रि. गो. हर्षल 31 (29 चेंडूत 4 चौकार), प्रियम गर्ग झे. डीव्हिलियर्स, गो. ख्रिस्तियन 15 (11 चेंडूत 1 षटकार), अब्दुल समद पायचीत गो. चहल 1 (3 चेंडू), वृद्धिमान साहा झे. डीव्हिलियर्स, गो. पटेल 10 (8 चेंडूत 1 चौकार), जेसॉन होल्डर झे. ख्रिस्तियन, गो. पटेल 16 (13 चेंडूत 2 चौकार), रशिद खान नाबाद 7 (9 चेंडूत 1 चौकार). अवांतर 4. एकूण 20 षटकात 7 बाद 141.
गडी बाद होण्याचा क्रम ः 1-14 (अभिषेक शर्मा, 1.5), 2-84 (विल्यम्सन, 11.3), 3-105 (गर्ग, 14.1), 4-107 (रॉय, 14.6), 5-107 (समद, 15.1), 6-124 (साहा, 17.2), 7-141 (होल्डर, 19.6).
गोलंदाजी ः मोहम्मद सिराज 3-0-17-0, जॉर्ज गॅरटॉन 2-0-29-1, शाहबाज अहमद 4-0-21-0, हर्षल पटेल 4-0-33-3, यजुवेंद्र चहल 4-0-27-1, डॅन ख्रिस्तियन 3-0-14-2.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर ः विराट कोहली पायचीत गो. भुवनेश्वर 5 (4 चेंडूत 1 चौकार), देवदत्त पडिक्कल झे. समद, गो. रशिद 41 (52 चेंडूत 4 चौकार), डॅन ख्रिस्तियन झे. विल्यम्सन, गो. कौल 1 (4 चेंडू), केएस भरत झे. साहा, गो. उमरान 12 (10 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), ग्लेन मॅक्सवेल धावचीत (विल्यम्सन) 40 (25 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), एबी डीव्हिलियर्स नाबाद 19 (13 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), शाहबाज अहमद झे. विल्यम्सन, गो. होल्डर 14 (9 चेंडूत 2 चौकार), जॉर्ज गॅरटॉन नाबाद 2 (3 चेंडू). अवांतर 3. एकूण 20 षटकात 6 बाद 137.
गडी बाद होण्याचा क्रम ः 1-6 (विराट, 0.6), 2-18 (ख्रिस्तियन, 3.2), 3-38 (भरत, 6.5), 4-92 (मॅक्सवेल, 14.1), 5-109 (देवदत्त, 16.5), 6-128 (शाहबाज, 18.4).
गोलंदाजी ः भुवनेश्वर 4-0-25-1, जेसॉन होल्डर 4-0-27-1, सिद्धार्थ कौल 4-1-24-1, उरमान मलिक 4-0-21-1, रशिद खान 4-0-39-1.
मॅक्सवेल धावचीत झाला आणि सामना जणू तिथेच फिरला!
स्फोटक फलंदाजी करणाऱया ग्लेन मॅक्सवेलने अवघ्या 25 चेंडूत 40 धावा फटकावत विजय आरसीबीसाठी आवाक्यात आणलाच होता. पण, ऐन मोक्याच्या क्षणी पडिक्कलला एकेरी धाव घेण्याची चूक नडली आणि मॅक्सवेलला धावचीत होत तंबूत परतावे लागले. एक्स्ट्रा कव्हरवरुन विल्यम्सनने यष्टीचा थेट वेध घेतला व हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
अन् षटकारांचा बादशाह शेवटच्या चेंडूवर अपयशी ठरला!
गोलंदाज कोणताही असो आणि स्टेडियम देखील कोणतेही असो, प्रत्येक चेंडूवर तुटून पडणे, अगदी षटकारासाठी देखील सहज भिरकावून देणे, हा एबी डीव्हिलियर्सचा आक्रमक बाणा. पण, हैदराबादविरुद्ध हा महान फलंदाज भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर मात्र षटकाराची हीच हुकूमत दाखवू शकला नाही आणि आरसीबीला तळाच्या स्थानावरील हैदराबादकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला.
भुवनेश्वरची ती क्लृप्ती शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून गेली!
शेवटच्या षटकात 13 धावांचे संरक्षण करायचे असताना आणि पहिल्या 2 चेंडूवर गॅरटॉन तसेच शेवटच्या 4 चेंडूंवर डीव्हिलियर्ससारखा कसलेला फलंदाज समोर असताना भुवनेश्वरचा कस लागणे साहजिक होते आणि यात भुवी पुरेपूर खरा उतरला. त्याने डीव्हिलियर्सला षटकात तीनवेळा फुल्ल आणि वाईड लेंग्थ चेंडू टाकले आणि शेवटच्या चेंडूवर त्याची ही रणनीती संघाला विजय मिळवून गेली. बरेच बाहेर असलेल्या चेंडूवर डीव्हिलियर्सला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न करण्यावाचून पर्याय नव्हता आणि 6 धावांची गरज असताना त्याला केवळ एकाच धावेवर समाधान मानावे लागले.