केशव स्मृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कोरगांवकर यांचा सत्कार सोहळा
प्रतिनिधी /वास्को
शिक्षणाच्या विकासाचे कार्य करणे म्हणजे राष्ट्र उभारणी करण्याचे कार्य असून शिक्षण संस्था म्हणजे समाजाचा मान व राष्ट्राची शान आहे. केशव स्मृती शिक्षण संस्था अशीच एक संस्था असून या संस्थेने अल्पावधीत मोठे शैक्षणिक कार्य घडवलेल आहे. त्यामुळेच त्यांचे संस्थापक आणि संस्था वाढवण्यासाठी कष्ट घेतलेले शिक्षक अभिनंदनास पात्र आहेत असे उद्गार समाजीक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ञ प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी काढले.
आल्त दाबोळी वास्को येथील केशव स्मृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कोरगांवकर यांचा 60 व्या वाढदिवसानिमित्त हायस्कुलच्या आवारात केशव स्मृती परिवारातर्फे सत्कार सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य सुभाष वेलिंगकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याचहस्ते पांडुरंग कोरगांवकर यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण विभागाचे माजी संचालक गजानन भट, शिक्षण विभागाचे माजी संचालक संतोष आमोणकर, निवृत्त मुख्याध्यापक पुरूषोत्तम कामत, निवृत्त शिक्षक विष्णू कुंभार, डॉ. सिताराम कोरगांवकर व केशव स्मृती हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सुषमा कोरगांवकर, उपमुख्याध्यापिका राजश्री जाधव उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात कार्य करणे म्हणजे राष्ट्र निर्माणाच्या कार्यात योगदान देण्यासारखे आहे. पांडुरंग कोरगांवकर यांचे शांत, संयमी वागणे, शिक्षणाच्या विकासाठी घेत असलेले कष्ट आणि त्यांच्यातील नेतृत्व गुण लक्षात घेता त्यांचे कौतुकच करावे लागेल. पांडुरंग कोरगांवकर यांना देवाने योग्य काम दिलेले आहे. मी कधी कुणाची स्तुती करत नसतो तर सर्वांनाच चोखपणे बजावतो असतो. मात्र, केशव स्मृती परीवराच्या कार्याची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. शिक्षण संस्था म्हणजे समाजाचा मान आणि राष्ट्राची शान आहे. केशव स्मृती ही संस्था पांडुरंगाला विलीन झाली आहे आणि पांडुरंग या संस्थेला विलीन झालेला आहे. हा माणूस शाळा टीकवण्यासाठी पैसे खिशात नसताना सुप्रिम कोर्टमध्ये केस लढवतो. दिल्लीच्या फुटपाथवर झोपून रात्र काढतो. असा सामाजिक कार्यकर्ता मी पाहिलेला नाही असे वेलिंगकर म्हणाले. जनशक्ती नेहमीच वर पाहिजे, राजशक्ती वर नको. जनशक्ती पुढे येण्यासाठी केशव स्मृतीसारख्या संस्था पुढे येणे गरजेचे आहे. शिक्षण संस्था मोठी करणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी शिक्षण विभागाचे माजी संचालक गजानन भट यांनी पांडुरंग कोरगांव यांच्या कार्याची प्रशंसा केले. शिक्षण विभागाचे माजी संचालक संतोष आमोणकर यांनी केशव स्मृती परिवाराचे अभिनंदन केले. कोरगांवकर हे शिक्षण क्षेत्रातील महर्षी असून हा सत्कार म्हणजे त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची पावती असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निवृत्त शिक्षक विष्णू कुंभार व इतर मान्यवरांनी आपले विचार मांडले.
उपमुख्याध्यापिका राजेश्री जाधव यांनी पांडुरंग कोरगांवकर यांच्यावरील मराठी कविता तर युगाली नाईक यांनी कोंकणी कविता सादर केली. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व बोगमाळो पंचायतीचे पंच संकल्प महाले व माजी विद्यार्थी मंजुनाथ कोपल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपमुख्याध्यापिका राजेश्री जाधव यांनी केशव स्मृती हायस्कुलसाठी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कोरगांवकर यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी पालक-शिक्षक संघाचे आजी माजी पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कोरगांवकर यांना केशव स्मृती परिवारातर्फे शिवाजी महाराजांचा पुतळा तर शाळेचे कला शिक्षक अर्जुन देसाई यांनी कॅनव्हासद्वारे रेखाटलेले पांडुरंग कोरगांवकर यांचे तैलचित्र प्रदान केले.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. प्राचार्य शंकर गांवकर, शिक्षिका वनिता वायंगणकर, उपमुख्याध्यापिका राजेश्री जाधव, शिक्षिका दिशा पाटील, दीपाली वायंगणकर, शिक्षिका ग्लोरिया रिबेलो आदी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा देसाई, पौर्णिमा राऊत देसाई व श्रृती यांनी केले तर आभार पौर्णिमा राऊत देसाई यांनी मानले.